सांगली : करणी व भानामती केल्याच्या संशयातून कुणीकोणूर (ता. जत) येथील मायलेकीच्या खूनाचा प्रकार घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या भावकीतील दोघांना अटक करण्यात आली असून, एकजण फरार आहे.
कुणीकोणूर येथे दि. २३ एप्रिल रोजी प्रियांका बेळुंखे (वय ३२) व मुलगी मोहिनी (वय १४) या दोघींचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पती बिरूदेव उर्फ बिराप्पा नाना बेळुंखे याला खूनाच्या आरोपाखाली अटकही केली होती. मात्र, तपासात दुहेरी खूनामागे अन्य कोणी तरी असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली. मृत महिलेचा खून भानामती व करणी केल्याच्या संशयातून झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
हेही वाचा – “छगन भुजबळ माझ्यासाठी शून्य माणूस, त्यांनी कधीही…,” सुहास कांदेंनी दिलं आव्हान
या खूनप्रकरणी भावकीतील अक्षय बेळुंखे, विकास बेळुंखे व बबलू बेळुंखे हे तिघे संशयित असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. तर बबलू हा फरार आहे. बिराप्पा याचा भावकीबरोबर वाद होता. मृत महिला करणी, भानामती करते, असा काहींचा समज होता. संशयित अक्षय बेळुंखे याचा मोठा भाऊ माजी सैनिक विजयकुमार बेळुंखे याचे काही महिन्यांपूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले होते. याचा मृत्यू करणीमुळेच झाला असल्याच्या संशयातून प्रियांका हिचा गळा आवळून खून करण्यात आला. हा प्रकार मुलगी मोहिनी हिने पाहिला. ती कोणाला तरी सांगणार म्हणून तिचाही ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला असल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.