* नागपूरमधील थरारक घटना
* मुलीच्या आईवरही चाकूहल्ला
एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू मेकॅनिकने नागपुरातील शासकीय तंत्रनिकेतनचे कार्यालयीन अधीक्षक योगेश दादाजी डाखोळे यांची देशी कट्टय़ाने गोळी झाडून आणि तीक्ष्ण शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केली. मंगळवारी रात्री हा थरारक प्रकार घडला. पतीला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या पत्नीवरही त्याने वार केल्याने त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. नागपुरातील मानेवाडा मार्गावरील श्रीनगरातील घरात बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास ही थरकाप उडवणारी घटना घडली. हत्याकांडानंतर माथेफिरू तरुणाने त्याच्या कथित प्रेयसीच्या पोटाला चाकू लावून गच्चीवर नेले आणि तेथून पसार होण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.  
डाखोळे पत्नी कुसुम आणि कन्येसह घरी झोपले सताना पहाटे अडीच वाजताच्या सुमारास त्यांच्या घराजवळ राहणारा अन्वरखान हा गॅरेज मेकॅनिक त्यांच्या शयनकक्षात शिरला. त्याने हातातील देशी कट्टय़ातून योगेश यांच्या दिशेने गोळी झाडली. त्या आवाजाने योगेश जागे झाले, मात्र त्यांच्या डोक्याला गोळी लागली. त्यांनी त्या स्थितीतही अन्वरशी झटापट केली. अन्वरने तीक्ष्ण व धारदार चाकूने योगेश यांच्यावर सपासप वार केले. त्यात योगेश यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराच्या आवाजाने पत्नी कुसुम आणि कन्या दोघीही उठल्या. पतीला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुसुम यांच्यावरही अन्वरने चाकूने सपासप वार केल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. यादरम्यान  त्यांची कन्या बचावासाठी आतील शयनकक्षात पळाली आणि तिने दार लावून घेतले. तिने लगेच मोबाइलवरून पोलिसांना कळविले. पोलीस येईपर्यंत शयनकक्षाचा दरवाजा तोडून अन्वरने तिला चाकूच्या धाकावर गच्चीवर नेले.
 तोपर्यंत झटापटीच्या आवाजाने शेजारच्या घरातील रहिवासी बाहेर जमले होते. हाती चाकू घेतलेल्या अन्वरला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन जखमी कुसुम यांना त्वरित उपचारासाठी भरती केले. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा