लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : अल्पवयीन मेव्हणीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल मेव्हण्यासह त्याच्या वडिलास बार्शीच्या सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी दीड लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड वसूल झाल्यास त्यातील एक लाख रूपये पीडित मुलीस देण्याचा आदेशही न्यायालयाने जारी केला आहे.

करमाळा तालुक्यात ७ मे २०१९ रोजी पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्याचा प्रयत्न झाला होता. बार्शीचे सत्र न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली.

आणखी वाचा-सांगली : दोन दिवसाच गटारीतून काढला ५२ टन कचरा

आरोपींचे कुटुंबीय करमाळा तालुक्यातील एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करीत होते. पीडित मुलगीही तेथे राहात होती. पीडित मुलीची बहीण शेतमालकाच्या भावाच्या शेतात कांदा काढण्यासाठी गेल्यानंतर इकडे भानुदास (नाव बदलले आहे.) याने अल्पवयीन मेव्हणीवर लैंगिक अत्याचार केला होता. नंतर मेव्हण्याने पीडित मुलगी शौचास गेली आणि परत आली नाही, अशी खोटी माहिती फैलावली होती.

दरम्यान, शेतमालकाच्या शेतातील उसाच्या फडात पीडित मुलगी बेशुद्धवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आली. या घटनेच्या तपासात भानुदास व त्याचे वडील या दोघांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली. पीडितेच्या बहिणीने करमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात सरकारतर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलीसह वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकारतर्फे ॲड. प्रदीप बोचरे, ॲड. दिनेश देशमुख आणि ॲड. राजश्री कदम यांनी काम पाहिले.

Story img Loader