अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ऋतुजा लटेकांचा विजय झाला आहे. लटकेंना ६६ हजार २४७ मतं मिळाली आहे. तर, नोटाला १२ हजार ७७८ मतं मिळाली असून, १ हजार ५६९ मतांसह राजेश त्रिपाठी तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरे गटाचा पहिलाच दणदणीत विजय आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. मात्र, यावर भाजपाचे नेते मुरजी पटेल यांनी टीका केली आहे.
“निवडणुकीतून माघार घेतली नसती, तर एक लाख २० हजार मते भाजपाला मिळाली असती. मात्र, याच्यात आम्हाला पडायचं नाही, ऋतुजा लटकेंना मी शुभेच्छा दिल्या आहेत. पण, एका गोष्टीची खंत वाटत आहे. श्रद्धांजली आणि सहानुभूतीच्या नावावर मते मागितली आणि नंतर फटाके फोडले आणि ढोल वाजवले, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,” अशी टीका मुरजी पटेल यांनी ऋतुजा लटकेंवर केली आहे.
हेही वाचा : ‘हर हर महादेव’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावर संभाजीराजे संतापले, इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप
“अंधेरीला पहिला महिला आमदार भेटल्या आहेत. त्यांना प्रत्येक कामात सहकार्य करु. मात्र, बांद्रा येथील तृप्ती सावंत यांच्याबद्दल जे घडलं, तसे २०२४ ला ऋतुजा लटके यांच्याबद्दल होऊ नये हीच अपेक्षा आहे. तसेच, एकाही भाजपा कार्यकर्त्याने नोटाला मतदान करण्यास सांगितलं नाही. स्वत:चा कमीपण समोर येऊ नये म्हणून असा आरोप येत आहे. १ लाख ९० हजार लोकांनी मतदान केलं नाही, याचं उत्तर महाविकास आघाडीला द्यावे लागले,” असेही मुरजी पटेल यांनी म्हटलं आहे.