पुरातत्व विभागाकडून तिकीट आकारणी होणार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिबाग : मुरुडच्या जंजिरा किल्ल्याला भेट देणे बुधवारपासून महागले आहे. भारतीय पुरातत्व विभागाने किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांकडून तिकीट आकारणी सुरू केली आहे. भारतीय नागरिकांसाठी २५ रुपये दराने तर विदेशी नागरिकांसाठी ३०० रुपये दराने तिकीट आकारणी केली जाणार आहे. याशिवाय छायाचित्रणांसाठी पर्यटकांना अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. या तिकीट आकारणीमुळे स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

मुरुडचा जंजिरा किल्ला हा कोकण किनारपट्टीवरील सगळ्यात भक्कम सागरी किल्ला म्हणून ओळखला जातो. इतिहासातील अजिंक्य किल्ला म्हणूनही या किल्ल्याची ओळख आहे. दरवर्षी मुरुडला आठ ते दहा लाख पर्यटक भेट देत असतात. यातील बहुतांश पर्यटक न चुकता या किल्ल्याला भेट देतात. शिडाच्या बोटींच्या मदतीने या किल्ल्यात जाण्याची सोय पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाते. किल्ल्याला भेट देणे हा खरोखरच विलक्षण अनुभव असतो. आता मात्र तुम्ही या किल्ल्यावर जाण्याचा विचार करत असाल तर

त्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागणार आहे. कारण भारतीय पुरातत्व विभागाने १ मे २०१९ पासून किल्ल्यास भेट देणाऱ्या पर्यटकांकडून तिकीट आकारणी सुरू केली आहे. भारतीय पर्यटकांना प्रत्येकी २५ रुपये, विदेशी पर्यटकांना प्रत्येकी ३०० रुपये, तसेच चित्रण करण्यासाठी व्हिडीओ कॅमेरा वापरायचा असेल तर त्याचे अतिरीक्त २५ रुपये मोजावे लागणार आहे. १५ वर्षांखालील पर्यटकांना तिकीट काढावे लागणार नाही. सकाळी ९ ते ५.३० पर्यंत याच कालावधीत पर्यटकांना हा किल्ला पहाता येईल. अशी माहिती पुरातत्व खात्याचे अधिकारी बी. जी. ऐलीकर यांनी नुकतीच पत्रकारांना दिली आहे.

मुरुडचे जंजिरा संस्थान ३१ जानेवारी १९४८ भारतात विलीन करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत कधीच या किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांकडून कुठलीही तिकीट आकारणी केली जात नव्हती. मात्र आता तिकीट आकारणी सुरू होणार आहे. पुरातत्त्व विभागाच्या या निर्णयामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. पुरातत्त्व विभागाकडून किल्ल्यावर कुठल्याच सुविधा पर्यटकांना उपलब्ध केल्या जात नाही. साधी स्वच्छता गृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील इथे उपलब्ध नाही.

पर्यटकांना दोन घटका बसता येईल. अशी सोयही उपलब्ध नाही. वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षित गाईड्स, माहिती फलकही उपलब्ध नाहीत. त्यामुळे आधी सुविधा द्या. मग तिकीट आकारणी करा. अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. किल्ल्यावर सोयी- सुविधांची वानवा आहे. अशा परिस्थिती पर्यटकांवर तिकिटांचा भुर्दंड लावला तर पर्यटकांची संख्या रोडावेल आणि याचा विपरीत परिणाम येथील पर्यटन व्यवसायाला बसेल, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murud janjira fort entry fee hike by archeology department