‘संगीतांजली’ निर्मित ‘गीत गीतामृत’ हा भगवद्गीतेवर आधारित संगीत कार्यक्रम असून आपल्या धर्मग्रंथातील जीवनदायी तत्त्वज्ञान सर्वाना आवडत्या अशा संगीताच्या माध्यमातून आबालवृद्धांसाठी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. गीता संदेश रसिकांपर्यंत पोहोचविणं, या महान ग्रंथाविषयीची आवड, जिज्ञासा वृद्धिंगत करणं हाच प्रमुख उद्देश ठेवून बांधलेला हा कार्यक्रम गीतकार कविवर्य नारायण दातार यांच्या ‘गीतगीता’ या पुस्तकातील निवडक गीतांवर आधारित आहे. निर्मिती, संकल्पना आणि प्रस्तुती सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार प्रदीप धोंड यांची आहे. ३ तासांचा हा कार्यक्रम असून एकूण ११ कलाकार (सहगायक, वादक, निवेदक) हा कार्यक्रम सादर करतात. या व्यतिरिक्त आवश्यक नेपथ्य, ध्वनिसंयोजन, कोरस यांच्या संतुलित समावेशाने कार्यक्रम दर्जेदार व मनोरंजक करण्याचा मन:पूर्वक प्रयत्न केला आहे. विविध संस्था, मंडळं तसेच दूरदर्शनच्या ‘सह्य़ाद्री’ वाहिनीद्वारे रसिकांपर्यंत पोहोचलेल्या या कार्यक्रमाचा प्रयोग रविवार, ३१ जानेवारी २०१६ रोजी, सायंकाळी ५.३० वा. सहयोग मंदिर, पहिला माळा, घंटाळी, ठाणे-पश्चिम येथे ‘उत्कर्ष मंडळ’-ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून संगीतप्रेमी रसिकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader