लोकसत्ता प्रतिनिधी
सातारा : सातारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ चौक या रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना आता संगीत ऐकू येणार आहे. या रस्त्याची नुकतीच पुनर्बांधणी करण्यात आली असून आता त्याच्या दुभाजकामध्ये स्पीकर बसवले जाणार आहेत. याद्वारे पहाटेच्या वेळी मंद आवाजात संगीत ऐकवले जाण्याची योजना आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून हा संगीत रस्ता तयार केला असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचे लोकार्पण करण्यात आले.
नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ चौक या मार्गावर जर्मन तंत्रज्ञानावर आधारित हा राज्यातील पहिला म्युझिकल (संगीत) रस्ता साकारण्यात आला आहे. या रस्त्यावरील डेकोरेटिव्ह लॅम्पवर स्पीकर बसवण्यात आले आहेत. पहाटेच्यावेळी भक्तिसंगीताच्या सुरांनी हा परिसर भारून जाणार आहे. यामुळे सातारकरांना एक नवीन आणि आध्यात्मिक अनुभव मिळणार आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ चौक हा मार्ग पूर्वी अत्यंत खराब होता. हाडे खिळखिळे करणारे खाचखळगे या मार्गावर होते. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पुढाकारामुळे या मार्गाचे रूपडे पालटले आहे. कधीकाळी सर्वांत खराब असलेला मार्ग आता सर्वांत सुंदर व आधुनिक बनला आहे. जर्मनी येथे अशा प्रकारच्या रस्त्यांचे तंत्रज्ञान वापरात आहे. हे तंत्रज्ञान वापरून राज्यात यापुढे रस्ते करण्यात येणार आहेत. प्राथमिक स्तरावर सातारा येथे हा राज्यातील पहिलाच प्रकल्प राबविण्यात आला आहे.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी अभिजीत बापट व नगर अभियंता दिलीप चिद्रे यांच्या सुचनेनुसार या मार्गावर अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या ‘म्युझिकल रोड’वर बसवण्यात आलेल्या स्पीकर व्यवस्थेचे संपूर्ण नियंत्रण नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातून पालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. रस्ता करण्यासाठी नगरोत्थान योजनेतून आठ कोटी वीस लाख ७० हजार ७८५ रुपये मंजूर करण्यात आले होते. या रस्त्याचे लोकार्पण सोहळा करण्यात आले. यावेळी आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगर अभियंता दिलीप चिंद्रे, अनिल देसाई व नागरिक उपस्थित होते.
पहाटे संगीताचे सूर
या रस्त्यावर वर्दळीचा काळ सोडून अन्य वेळी म्हणजे पहाटे हे संगीत ऐकवले जाणार आहे. या वेळी या रस्त्यावर सकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. या मंडळींना व्यायामासोबतच संगीताचा आनंदही आता घेता येणार आहे. साताऱ्यात पहिल्यांदाच असा अनोखा रस्ता तयार करण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. तसेच रात्रीच्यावेळी हा रस्ता प्रकाशयमय दिसत असल्याने त्याचे देखणे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
शहरातील सर्व रस्ते जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करत बनवले जाणार आहे. यामध्ये रस्त्याच्या बांधणीसोबतच त्याचा अन्य उपयोगांचा पुरेपूर विचार केलेला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या विविध वाहिन्यांसाठी रस्ता वारंवार खोदावा लागू नये, चांगली प्रकाश योजना असावी, तसेच संगीताचे सूर ऐकवले जाणार आहेत. -शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री