हिजाबप्रकरणी धैर्य दाखविणाऱ्या कर्नाटकातील मुस्कान खान या विद्यार्थिनीचे नाव एका उर्दू घरास देण्याचा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आणलेला ठराव गुरुवारी झालेल्या मालेगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली आभासी पद्धतीने ही सभा पार पडली. परस्परविरोधी मतप्रवाहांमुळे आठवडाभरापासून नामकरणाचा विषय येथे चर्चेत होता.
कर्नाटकातील शैक्षणिक संकुलांमध्ये हिजाब परिधान करण्यास विरोध करण्यावरून उद्भवलेल्या वादामुळे येथील मुस्लीम समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यातून हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलने करण्यात आली. कर्नाटकात हिजाब परिधान करण्यास विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका गटास मुस्कान खान या विद्यार्थिनीनेही सडेतोड उत्तर दिले होते. मुस्कानची ही कृती धैर्य दाखवणारी असल्याने येथील एका घरास तिचे नाव देण्याची इच्छा महापौर ताहेरा शेख यांनी जाहीर केली होती. त्यानुसार सभेत सत्ताधारी गटाने आणलेला नामकरणाचा ठराव बहुमताने मंजूर झाला. या ठरावास भाजपने तीव्र विरोध केला तर शिवसेनेचे सदस्य तटस्थ राहिले. जनता दलाच्या शान-ए-हिंदू यांनी घरास शहरातील अन्य नामांकित व्यक्तींचे नाव देण्याचा आग्रह धरत या ठरावास विरोध दर्शविला. जनता दलाचा समावेश असलेल्या महागठबंधन आघाडीची मात्र या ठरावास मूकसंमती असल्याचे चित्र दिसले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगरप्रमुख तथा काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांच्या आमदार निधीतून आठ कोटी खर्चाचे हे उर्दू घर साकारण्यात आले आहे. अनेक महिन्यांपासून ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.