भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नूपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन आज देशाबरोबरच राज्यातील अनेक शहरांमध्ये मुस्लिम समाजाने रस्त्यावर उतरुन विरोध दर्शवल्यानंतर यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. “नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणावर मुस्लिम जनसमूदाय आज विविध ठिकाणी रस्त्यावर उतरला आहे. नूपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाची गंभीर दखल राज्य शासन व गृह विभागाने घेतली असून पोलिसांचा तपास सुरु आहे,” असं वळसे पाटील म्हणालेत.

नक्की वाचा >> प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: “नुपूर शर्माला फाशी द्या”; महाराष्ट्रातील नेत्याची केंद्राकडे मागणी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या आहेत. तसेच, “सर्वांनी शांतता पाळावी, राज्यात कुठेही कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी,” असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मोर्चा
महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि सोलापूरात देखील मुस्लीम समुदायाने एकत्र येत निदर्शने केली. औरंगाबादमधील विभागीय कार्यालयासमोर मुस्लीम बांधव हजारोंच्या संख्येनं जमल्याच पहायला मिळालं. येथे त्यांनी भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर सोलापुरात देखील एमआयएम पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून एमआयएमचे शक्तिप्रदर्शनही पाहायला मिळालं.

नक्की वाचा >> प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: “देवेंद्र फडणवीसांनी कॉल केला आणि म्हणाले, बेटा…”; नुपूर शर्मांच्या मुलाखतीचा Video चर्चेत

देशभरात आंदोलने…
दिल्लीतील जामा मशिदीबाहेर आज (१० जून) नमाज पठणानंतर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आणि त्यांनी नपूर शर्मांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी हातात पोस्टर्स घेत नुपूर शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील केली. दिल्लीनंतर मुस्लीम समुदायाच्या आंदोलनाची धग देशभरातील अनेक शहरापर्यंत पोहोचली आहे. लखनऊ, कानपूर आणि फिरोजाबाद सारख्या शहरांत देखील मुस्लीम समुदायाकडून मोर्चे काढले आहेत. यानंतर पोलिसांनी संबंधित शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

नक्की वाचा >> प्रेषित अवमान प्रकरण: “मोदींनी हे समजून घेण्याची गरज आहे की…”; भाजपाला लक्ष्य करत ओवेसींकडून नुपूर शर्मांच्या अटकेची मागणी

दिल्लीतील जामा मशिदी बाहेरच्या निदर्शनानंतर उत्तर प्रदेशातील सहारनपूर, मुरादाबाद आणि प्रयागराजच्या रस्त्यावर शेकडो मुस्लिमांनी मोर्चा काढत दुकानं बंद करण्यास लावलं आहे. तर प्रयागराजमधील एका भागात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचीही माहिती मिळत आहे. मागील काही तासांपासून येथील परिस्थिती अस्थिर आहे. प्रेषित मोहम्मद यांचा अवमान केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दंगल उसळली होती. यामध्ये जवळपास ४० लोक जखमी झाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslim protest at various cities in maharashtra dilip walse patil on nupur sharma issue scsg