मिरज शहरात ३६० मंडळांपकी १५ मंडळांचे अध्यक्ष या वर्षी मुस्लीम कार्यकर्त्यांकडे सोपविण्यात आले असून जातीय सलोख्याचा संदेश या निमित्ताने समाजाला दिला जात आहे. या मंडळाच्या रोजच्या गणेशाच्या आरतीला मुस्लीम तरुणाईही आवर्जून हजेरी लावत असल्याचे दिसत आहे. चालू वर्षी डॉल्बीमुक्त उत्सवाला सांगलीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून मंडळांनी या वाचलेल्या वर्गणीचे पसे जलयुक्त शिवार अभियानाला देण्यास प्राधान्य दिले आहे.
गणेशोत्सवाची सांगता होण्यास अवघे दोन दिवस उरले असताना कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहचला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने नवनवीन उपक्रम साजरे केले जात आहेत. मिरज शहरात ३६० हून अधिक मंडळांनी सार्वजनिक गणेशाची स्थापना केली असून यापकी १५ मंडळांचे अध्यक्ष मुस्लीम कार्यकत्रे आहेत, तर काही मंडळाच्या कार्यकारी मंडळात मुस्लीम कार्यकत्रेही सहभागी झाले आहेत. मिरज शहरातील अष्टविनायक गणेश मंडळ शिकलगार गल्ली मंडळाचे अध्यक्ष वसीम मुस्तफा मोमीन हे आहेत, तर अन्य मंडळाचे मुस्लीम कार्यकत्रे असे कुंभार गल्ली न्यू अजिंक्यतारा अमजद हैदर पठाण, माळी गल्ली नरसिंह मंडळ रमजान आदम शेख, इस्राइल नगर श्री साई मंडळ सलीम आयुब पठाण, तराळे गल्ली कूपवाड आझाद चौक मंडळ इम्तियाज शमशुद्दीन बोरगावकर, गुलमोहर कॉलनी सिद्धिविनायक मंडळ तौफिक युनुस पाथरवट, वीर भगतसिंग कमानवेस बामणोली कबीर बशीर शेख आणि संग्राम सोशल गुप यशवंतनगर शहारूक शब्बीर मुलाणी. याशिवाय मिरज तालुक्यातील चार गावांतील सार्वजनिक मंडळाचे अध्यक्षपद मुस्लीम कार्यकर्त्यांकडे सोपविण्यात आले आहे.या वर्षीचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न बहुतांशी यशस्वी ठरला असून पाचव्या व सातव्या दिवशीच्या मिरवणुका पूर्णपणे डॉल्बी मुक्त करण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे. १३०० हून अधिक मंडळांनी या वर्षी डॉल्बीला कायमचा रामराम ठोकण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले असून नियमभंग करणाऱ्या मंडळाविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्याचे पोलीस यंत्रणेने निश्चिय व्यक्त केला असून मिरजेत दोन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून वाहनासह डॉल्बी यंत्रणा जप्त करण्यात आल्याची माहिती उप अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली. डॉल्बीला फाटा दिल्याने वाचलेल्या उत्सवाच्या खर्चातील रक्कम जलयुक्त शिवारला देण्याचा विडा काही मंडळांनी अमलात आणला असून हा निधी लाखो रुपये जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे सुपुर्द करण्यात येत आहे. कर्नाळ गावात पोलिसाविना गणेशोत्सव ही संकल्पना राबविण्यात येत असून बंदोबस्तास पोलिसांची मदत न घेता कार्यकत्रे आपणहून सहकार्य करीत आहेत.