सोलापूर : माहेरहून पाच लाखांची रक्कम आणत नाही आणि चारित्र्याचा संशय घेत येथील एका मुस्लीम तरुणाने त्यांच्या पत्नीस तोंडी तलाक देत डोक्यावरील संपूर्ण केस कापून विद्रूप करण्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पतीसह सासू व सासरे यांच्या विरोधात पोलिसांनी मुस्लीम महिला संरक्षण कायद्यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तोंडी तलाक बंदीनंतरही विवाहितेवर अत्याचार करत तोंडी तलाक देण्याच्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सुमय्या कलीम चौधरी (वय २०) असे दुर्दैवी पीडित नवविवाहितेचे नाव आहे. तिच्या तक्रारीनुसार पती कलीम सत्तार चौधरी, सासू रजिया सत्तार चौधरी आणि सासरे सत्तार चौधरी (रा. फैजुलबारी मशिदीजवळ, राजेंद्र चौक, सोलापूर) यांच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित सुमय्या हिचा विवाह १३ मे २०२२ रोजी झाला होता. सासरी नांदण्यास आल्यानंतर लगेचच तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळींनी तगादा लावला. परंतु तिने एवढी रक्कम देण्याची माहेरची आर्थिक कुवत नसल्यामुळे मागणीची पूर्तता करण्यास नकार दिला. त्यामुळे चिडून पतीसह सासू-सासरे तिचा सातत्याने छळ करू लागले. तिला घरातील एका अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवले जात होते. तिच्या चारित्र्यावरही संशय घेण्यात येऊ लागला. यातूनच पुढे सासू व सासऱ्याच्या सांगण्यावरून पती कलीम याने ओळखीच्या नाभिकाला घरी बोलावले आणि सुमय्या हिच्या डोक्यावरचे संपूर्ण केस कापून मुंडन केले. एवढय़ावरच न थांबता पती कलीम याने तिला पुन्हा मारहाण करून ‘तलाक’ असे तीन वेळा तोंडी उच्चारून तिला नांदविण्यास नकार दिला. एका कागदावर तिची बळजबरीने सही घेतली. नंतर तिला पुन्हा अवमानित करत दहिटणे येथे माहेरी आणून सोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.