संगमनेर : मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान ईद निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सौगात ए मोदी’ या उपक्रमावरून देशात सध्या राजकीय मतमतांतरे आहेत. असे असले तरी संगमनेरमधील मुस्लिम समाजाने या उपक्रमाचे स्वागत करत पंतप्रधान मोदींना पत्र पाठवत या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. हे पत्र सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.

‘सौगात ए मोदी’ उपक्रमांतर्गत देशभरातील ३२ लाख मुस्लिम कुटुंबांना ईदनिमित्त भेटवस्तू देण्यात येत आहेत. या योजनेवरून मोठ्या प्रमाणात राजकीय टीका टिप्पणी होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या उपक्रमाची ‘सौगात ए सत्ता” अशा शब्दात खिल्ली उडवली. निवडणुकीत ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ या घोषणा द्यायच्या. होळीला मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि ईद जवळ आली म्हणून त्यांना पुरणपोळी द्यायची असे भाजपचे धोरण अशा शब्दात ठाकरे यांनी या उपक्रमावर टीका केली होती. आता भाजपने हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करावे असा खोचक सल्लाही त्यांनी दिला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सौगात ये मोदी म्हणजे ‘सौ चूहे खाके बिल्ली चली हज’ असे असल्याचा टोला लगावला होता. एकूणच विरोधी पक्ष्यांनी या योजनेवर टीका केली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर संगमनेर मधील मुस्लिम समाजाने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहीत या उपक्रमाचे स्वागत केले आहे. येथील प्रांत अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, “आपला भारत देश विविधतेने नटलेला असून सर्व जाती-धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. राम आणि रहीम यांची संस्कृती जपणारा हा देश आहे. आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर कोणताही कटुतेचा भाव न ठेवता रमजान महिन्यात ‘सौगात ए ईद’ उपक्रमासाठी पुढाकार घेतला, याचे आम्हाला अभिनंदन करावेसे वाटते.”

याच पत्रात पुढे मुस्लिम समाजाने पंतप्रधान मोदींकडे एक मागणीही केली आहे. “आपण दिलेली भेट आम्ही स्वीकारणार आहोत. परंतु समाजात द्वेष पसरवणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी, अशी आमची विनंती आहे. समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या लोकांना कोणताही धर्म नसतो. त्यांच्यावर कारवाई केल्यास आम्हाला खरा आनंद होईल,” असेही या पत्रात म्हटले आहे. हे पत्र देताना संगमनेरचे मुस्लिम धर्मगुरू शहर काझी अब्दुल रकीब अब्दुल वाहब पिरजादे, शौकत पठाण, अझीज ओव्होरा, साजिद शेख, शाहरुख शेख, इस्माईल शेख, जावेद शेख, जमीर शेख, आसिफ शेख, सालार मिर्झा, शोएब खान आदी उपस्थित होते.