मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतंत्र विदर्भ अस्तित्वात येणे अशक्य असल्याचे वक्तव्य नागपुरात केल्याचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मताशी सहमत नसल्याचे दोनच दिवसांपूर्वी रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले होते. आता नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी आणखी कडक भूमिका घेताना विदर्भातील काँग्रेसच्या आमदारांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी उठाव करण्याची भावनिक हाक देऊन काँग्रेसश्रेष्ठींना अडचणीत आणण्याची खेळी खेळली आहे.
संयुक्त महाराष्ट्रातून वेगळे होण्याची हीच वेळ असून, यावेळी वेगळा विदर्भ अस्तित्वात आला नाही तर पुन्हा कधीच होणार नाही, असे आवाहन मुत्तेमवारांनी केले असून, मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. ‘विदर्भाच्या भक्कम पाठिंब्यावरच महाराष्ट्र उभा आहे हे चव्हाण यांनी विसरू नये. विदर्भातील लोकप्रतिनिधींना उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत नेहमीच दुय्यम वागणूक दिली जाते. राज्य मंत्रिमंडळात समावेश केलेल्यांना कमी महत्त्वाची खाती दिली जातात,’ अशी टीका मुत्तेमवारांनी केली आहे.
मुत्तेमवारांनी या पत्राच्या प्रती विदर्भातील काँग्रेसच्या सर्व लोकप्रतिनिधींना पाठविल्या असून, या मुद्दय़ावर एकत्र लढा देण्यासाठी सक्रिय होण्याची वेळ आल्याचे नमूद केले आहे. तेलंगण निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्यानंतर काँग्रेसमधून पहिला आवाज उठविणारे मुत्तेमवार आता या लढय़ाचे नेतृत्त्व स्वत:कडे घेऊ इच्छित असल्याचा निष्कर्ष राजकीय वर्तुळात काढण्यात येत असून मुत्तेमवारांच्या पत्राचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटण्याची शक्यता वर्तविण्यात  आली आहे. मुत्तेमवारांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत कलम ३७७ अन्वये हा मुद्दा उपस्थित केला होता. वध्र्याचे खासदार दत्ता मेघे यांनीही या मुद्दय़ावर आतापर्यंत धारण केलेले मौन सोडले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील वैदर्भीय नेते आता आक्रमक भूमिकेत आल्याचे समजले जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अलीकडील विस्तारात समावेश करण्यात न आल्याने विदर्भाच्या मागणीचा पाठपुरावा करीत असल्याचा मुत्तेमवारांनी इन्कार केला आहे.

Story img Loader