MVA Agitation : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात महाविकास आघाडीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी राज्यसभेत अमित शाह यांनी सोमवारी एक वक्तव्य केलं होतं. आंबेडकरांचं नाव घेणं ही फॅशन झाली आहे. आंबेडकर-आंबेडकर असा जप करण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर पुण्य लागलं असतं असं अमित शाह म्हणाले. त्याचा निषेध नोंदवला जातो आहे. याचेच पडसाद हिवाळी अधिवेशनातही ( MVA Agitation ) पाहण्यास मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिवाळी अधिवेशनात काय घडलं?

विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी आंदोलन ( MVA Agitation ) केलं. तसंच यावेळी घटनेकरता सामील व्हा अशा घोषणाही देण्यात आल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) अशा तिन्ही पक्षांचे आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते. निळ्या टोप्या, निळी उपरणी आणि हातात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन हे आंदोलन करण्यात आलं.

नाना पटोले काय म्हणाले?

बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान भाजपाने केला आहे त्यामुळे भाजपाचं चरित्र देशासमोर आलं आहे. भाजपाला संविधान संपवायचं आहे, अमित शाह यांच्या वक्तव्यावरुन हेच सिद्ध होतं आहे असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- आंबेडकरांचा अपमान नाही! अमित शहांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

देशाची जनता रस्त्यावर उतरली ( MVA Agitation ) आहे कारण अपमान हा फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा नाही तर संपूर्ण देशाचा झाला आहे. माझा सवाल आहे की रामदास आठवले हे भाजपासह राहणार आहेत का? चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे भाजपासह राहणार आहेत का ते त्यांनी सांगावं. महामानव बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अनेक आमदार भाजपात किंवा त्यांच्या बरोबर आहेत ते राजीनामा देणार आहेत का? माझा त्या सगळ्यांना हा सवाल आहे कारण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्यात आला आहे. असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत जे वक्तव्य केलं त्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे.मी शांत आहे वगैरे असा काही प्रश्न नाही. मला पोहचण्यासाठी थोडा उशीर झाला इतकंच कारण आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर निष्ठा असणारे लोक हे बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या घटनेमुळे त्यांचे अधिकार टिकवून आहेत. घटनेत बदल करण्यासाठी काही षडयंत्र रचायला सुरुवात झाली तेव्हा देशातल्या जनतेने एक होऊन त्याला तोंड दिलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विशिष्ट लोक मानतात असं नाही तर संपूर्ण देश मानतो. बाबासाहेब आंबेडकरांबाबत जर असे उद्गार निघाले तर प्रतिक्रिया उमटणारच ( MVA Agitation ) असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mva agitation against amith shah and bjp government over babasaheb ambedkar statement issue scj