पुणे लोकसभेतील काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी उद्या (दि. ३ मे) पुण्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा होणार आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांवर आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करोना काळात भ्रष्टाचार झाला असा आरोप त्यांनी केला. करोना काळात बॉडीबॅग घोटाळा झाला, उबाठा गट कफन चोर आहे, असेही फडणवीस म्हणाले होते. या टीकेसंदर्भात रवींद्र धंगेकर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना धंगेकर यांनीही फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
त्यांना नमस्कार करायलाही कुणी शिल्लक नसेल
“भाजपा आज देशातील सर्वात श्रीमंत पक्ष आहे. जे ७० वर्षांत काँग्रेसला जमलं नाही ते भाजपाने १० वर्षांत करुन दाखवलं. भाजपाइतके पैसे आज कोणत्याही पक्षाकडे नाहीत. करोना काळात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची आजही आठवम काढली जाते. त्याचे श्रेय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस आज आरोप करत आहेत, ते त्यांचे कामच आहे. ते कुणाचाही करेक्ट कार्यक्रम करू शकतात”, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.
“ती मोदींची स्टाईल…”, शरद पवारांकडून पंतप्रधानांची नक्कल; म्हणाले, “जाईल तिथं ते…”
राजकारण हे राजकारणाच्या जागेवर राहिले पाहीजे, असेही धंगेकर म्हणाले. “महाराष्ट्रात आजवर अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. त्यांचे नाव आजही घेतले जाते. त्यांच्या कामाची उजळणी केली जाते. देवेंद्र फडणवीस असे नेते आहेत की, ते ज्यादिवशी राजकारण सोडतील, त्यादिवशी त्यांना नमस्कार करायलाही कुणी शिल्लक राहणार नाही. सत्ता असल्यामुळेच आज लोक त्यांना नमस्कार घालत आहेत. सत्ता नसताना त्यांचे काय होते, हे बघा”, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली.
अजितदादांना डोळ्यात पाणी येईपर्यंत त्रास दिला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दैवत बदलण्याचे विधान केल्यानंतर यावर अनेक नेत्यांनी भाष्य केले आहे. धंगेकर यांनाही टीव्ही ९ वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, अजित पवार हे कोणत्या परिस्थितीत भाजपाबरोबर गेले, हे सर्वांना माहितच आहे. पवार कुटुंबात फूट पडू नये, अशी अनेकांची एवढंच काय माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याचीही तीच भावना होती. पण अजित पवारांना प्रचंड त्रास दिल्यामुळे एनडीएत जावे लागले. अजित पवारांच्या डोळ्यात पाणी येईपर्यंत त्यांना त्रास दिला गेला. पण यापुढे विधानसभा, महानगरपालिका या निवडणुकीत अजित पवार गटाला किती संधी मिळते? हे आता पाहावे लागेल.
“आज देशासमोर अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी, महागाई आणि देशाची खालावलेली अर्थव्यवस्था याबाबत अनेक प्रश्न आहेत. राहुल गांधी या प्रश्नांवर भाष्य करतील. पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षांपूर्वी जी वचने दिली होती, त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. देश आज हुकूमशाहीकडे चालला आहे, अशी सर्वांची भावना झाली आहे. अशावेळी देशातील अनेक घटक चिंता व्यक्त करत आहेत. न्यायालये, माध्यमे आणि इतर स्वायत्त संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. हीच परिस्थिती पुढे कायम राहिल्यास, देशासाठी ते योग्य होणार नाही”, असेही रवींद्र धंगेकर म्हणाले.