मागील काही काळापासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करून चार महिने उलटली आहेत. तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यामुळे शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. तसेच येत्या काही दिवसांत राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कोसळेल आणि राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल, असा दावाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या आषाढी कार्तिकीला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्रीच पांडुरंगाची शासकीय महापूजा करतील, अशा आशयाचं विधान मिटकरी यांनी केलं आहे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अमोल मिटकरी यांनी आज (शुक्रवारी) कार्तिकी एकादशीनिमित्त शिर्डी येथे मंथन शिबिराला हजेरी लावली. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

हेही वाचा- “राष्ट्रीय पक्ष म्हणून वाटचाल करणारी शि. ऊ. बा. ठा…”, मनसेचा उद्धव ठाकरे गटाला खोचक टोला!

अमोल मिटकरी म्हणाले, “आज कार्तिकी एकदशी आहे. एक वारकरी म्हणून मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेस आणि वारकऱ्यांना शुभेच्छा देतो. आज मी शिर्डीमध्ये आहे. याठिकाणी आमचं मंथन शिबीर होणार आहे. ज्या-ज्या वेळी आषाढी कार्तिकी किंवा पंधरवाडा एकादशीचा योग आला, तेव्हा-तेव्हा राज्यात बरंच मोठं परिवर्तन घडलं. महाराष्ट्रातील जनतेच्या विशेषत: शेतकऱ्यांच्या मनात शिंदे-फडणवीस सरकारबद्दल प्रचंड रोष आहे.

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंना भाजपाबरोबर युती…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

“आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असतं. आषाढी एकदशीला मुख्यमंत्री विठुरायाची शासकीय महापूजा करतात. आगामी आषाढी एकादशीला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीच पांडुरंगाची शासकीय महापूजा करतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री असेल. याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या मनातदेखील शंका नाही. अजित पवारांसारखं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभो, हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. पुढच्या आषाढी एकादशीला अजित पवारांच्या हस्ते पाडुरंगाची महापूजा घडो, अशी आमची अपेक्षा आहे” असंही मिटकरी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mva government will come in power in maharashtra ashadhi ekadashi amol mitkari on ajit pawar as cm rmm
Show comments