MVA : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला उत्तम यश मिळालं. त्यानंतर महाविकास आघाडीला विधानसभेतही चांगलं यश मिळेल असे अंदाज लावले जात होते. मात्र महायुतीने बाजी मारली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३७ जागा मिळाल्या. महायुतीचं सरकार राज्यात आलं आहे तसंच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि अजित पवार तसंच एकनाथ शिंदे हे दोघं उपमुख्यमंत्री आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला आहे. दरम्यान आता महाविकास आघाडीतले खटके पाहण्यास मिळत आहेत.
नितीन राऊत यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आम्ही म्हणजेच महाविकास आघाडीने फक्त वाटाघातीत वेळ घालवला. संघटनात्मक बांधणी आणि विधानसभा निवडणुकीकडे आम्ही दुर्लक्ष केले, अशी स्पष्ट कबुली काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी दिली आहे. नितीन राऊत यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नितीन राऊत आणखी काय म्हणाले?
“शरद पवार यांनी काही संघाचं कौतुक केलं नाही. पक्षाच्या बांधणी कशी असली पाहिजे या अनुषंगाने शरद पवार बोलले असतील असं मला वाटतं. संघाने ज्या पद्धतीने काम केलं ती पद्धत कशी आहे ते शरद पवार यांनी म्हटलं आहे. असं मला वाटतं. ते काही संघाचं कौतुक नाही. असं मला वाटतं.” असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
आम्ही गाफिल राहिल्यानेच पराभव झाला-राऊत
आमचा पराभव झाला हे मान्य करावंच लागेल. वाटाघाटींमध्ये आम्ही गाफील राहिलो. गाफिल राहणं एकट्याकडून झालेलं नाही. महाविकास आघाडी केली तेव्हा आघाडीने लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवलं. त्यानंतर आमचा वाद मुख्यमंत्रिपदावरुन वाद घालत बसलो, वाटाघाटीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. जमिनीवर काय चित्र आहे हे पाहण्यात आम्ही पाहू शकलो नाही हे मान्य करावंच लागेल. गाफिलपणा झाला, त्याचे परिणाम आम्ही पाहतो आहोत असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. नितीन राऊत यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं.
तोच आमचा गाफिलपणा झाला-नितीन राऊत
विधानसभा निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीमध्ये अनेकांच्या मुख्यमंत्री होण्यासाठीच्या महत्त्वाकांक्षा बळावल्या होत्या का? असा प्रश्न विचारल्यावर नितीन राऊत म्हणाले, होय, तोच तर आमचा गाफीलपणा होता, असे नितीन राऊत म्हणाले. काँग्रेसमध्ये लवकरच हाय कमांडकडून संघटनात्मक बदल केले जातील. विधिमंडळ पक्षनेता, विधानसभा गटनेता आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या तिन्ही पदांसाठी हाय कमांडकडून लवकर निर्णय होतील, अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.