महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील गोरेगाव येथे उत्तर भारतीय लोकांच्या बैठकीला हजेरी लावली. मी तुमच्याकडे पाठिंबा मागण्यासाठी आलो आहे, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीवर कडाडून हल्लाबोल केला. जेव्हा देशाच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपाला नगण्य स्थान होतं, तेव्हा आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बाळासाहेब ठाकरेंनी वाचवलं होतं, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.
उत्तर भारतीय नागरिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “उत्तर भारतीयांना वेगळं म्हणण्यापेक्षा आता भारतीयांना याचं उत्तर पाहिजे की, भाजपाचं हिंदुत्व नेमकं काय आहे? हे संपूर्ण भारताला जाणून घ्यायचंय. एकमेकांचा द्वेष करणं, हे हिंदुत्व नाहीये. मी आज तुमच्यासमोर आलोय. तुमच्यामध्ये आलोय. मी नेहमीच तुमच्यात राहू इच्छित होतो. मग मी यात चुकीचं काय करतोय? मागील २५-३० वर्षे आमची भाजपाशी युती होती. ती एक राजकीय मैत्री होती. ती आम्ही निभावली. पण आम्हाला काय मिळालं?”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मागील २५-३० वर्षात आमच्यात एक आपलेपणा होता. पण ते जेव्हा खुर्चीवर जाऊन बसले, तेव्हा त्यांना वाटलं, आता आम्हाला यांची (शिवसेनेची) गरज नाही. त्यामुळे त्यांनी अकाली दल आणि शिवसेनेसारख्या पक्षांना सोडलं. ज्या राजकीय पक्षांनी त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवलं, त्या पक्षांची आता गरज काय? असं त्यांना वाटू लागलं. पण हा रस्ता अवघड होता.”
हेही वाचा- “कायद्याचा अभ्यास करून सरकार स्थापन केलं”; फडणवीसांचं विधान, सुप्रीम कोर्टाच्या निकालावरही भाष्य
“तो काळ आम्हाला आजही आठवतोय. साधारणत: १९९५ च्या आधीची गोष्ट आहे. जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होती. तो काळ आता आठवला तर त्या काळात देशाच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपा अस्पृश्य पार्टी होती. कुणीही आम्हाला साथ द्यायला तयार नव्हतं. हातात हात द्यायची गोष्ट तर विसराच… पण कुणाची शेजारी येऊन उभं राहायचीही हिंमत करत नव्हतं, आम्ही सांप्रदायिक आहोत, असं म्हटलं जायचं,” असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.
हेही वाचा- “ही ब्रेकिंग न्यूज टाका”, सुप्रीम कोर्टाआधीच सत्तासंघर्षाच्या निकालावर नारायण राणेंचं सूचक विधान
“शिवसेना-भाजपासाठी जेव्हा वाईट दिवस होते. तेव्हा माझ्या वडिलांनी आता जे पंतप्रधान आहेत, त्यांना वाचवलं होतं. ही गोष्ट खरी आहे. तेव्हा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते. ते राजधर्माचं पालन करण्यासाठी बाहेर पडले होते. वाजपेयी यांनी राजधर्माचं पालन केलं असतं तर आज जे पंतप्रधान पदावर बसलेत, ते तिथे बसलेले दिसले नसते.पण बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.