शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं आहे. हे सरकार स्थापन करत असताना अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. बंडखोर आमदारांना सुरुवातीला सुरत, गुवाहाटी आणि त्यानंतर गोवा असा प्रवास करून मुंबईत यावं लागलं.
दरम्यान, शिंदे गटाची बंडखोरी यशस्वी ठरणार की फसणार? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. या सर्व घडामोडींनंतर शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं विधानं केलं आहे. आमची बंडखोरी फसली असती, तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहावी लागली असती, असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं आहे. ते जळगावात एका कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी केलेल्या भाषणात गुलाबराव पाटील म्हणाले, “मी भाजपावाल्यांना नेहमी बोलतो की, आम्ही सट्टा खेळून तुमच्याकडे आलोय. आमच्या आयुष्याचा आम्ही सट्टा खेळला. आम्ही आठ लोकांनी मंत्रीपद सोडून दिलं होतं. आमच्याकडे बहुमत आलं नसतं तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहावी लागली असती. लोकं साधं सरपंचपदही सोडत नाही. पण तेव्हा आम्ही आठ जणांनी मंत्रीपद सोडलं. त्यावेळी आम्हाला ३८ आमदार हवे होते. मी ३३ वा होतो. आणखी पाच आमदार आले नसते, तर माझा कार्यक्रम आटोपला होता. आम्हाला पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागलं असतं किंवा सरकार कोसळलं असतं” असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं आहे