निवडणुकीच्या िरगणात प्रचाराची धूळधाण उडत असून प्रमुख उमेदवारांसह नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लावत असल्याचे चित्र आहे. यात मराठवाडय़ातील दोन्ही माजी मुख्यमंत्रीही मागे नाहीत.
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित सभेत बोलताना ‘ही निवडणूक म्हणजे माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. कसेही करून काँग्रेसलाच मतदान केले पाहिजे. तुम्ही चुकूनही चूक केली तरी त्याचे परिणाम सगळय़ांनाच भोगावे लागतील,’ असा इशारा दिला. दुसरीकडे लोहा येथे सभेत बोलताना अशोक चव्हाण यांनी, ‘या निवडणुकीत माझी शान राखा व काँग्रेसलाच मतदान करा. सध्या काँग्रेस अडचणीत आहे. या अडचणीच्या काळात माझ्यावर मराठवाडय़ाची जबाबदारी सोपविली आहे. माझी शान राखण्यासाठी काँग्रेसच्या बाजूने मतदान करा,’ असे आवाहन केले. ‘शोले’ चित्रपटातील बसंती आपली घोडी धन्नो हिला, ‘चल धन्नो, आज मेरी इज्जत का सवाल है’ असे म्हणते. तेच वाक्य लातूर मतदारसंघात अशाप्रकारे आळवले जात आहे.
लातूर लोकसभेतील सामान्य मतदार मात्र ‘आम्ही आतापर्यंत निलंगेकर असोत की चव्हाण, त्यांची इज्जत वाचवण्यासाठी मतदान केले, पण आमची इज्जत जाते तेव्हा ही मंडळी कुठे असतात?’ असा सवाल करीत आहेत. गारपिटीपासून पिण्याचे पाणी, आरोग्य आदी प्रश्न भेडसावत असताना आमची इज्जतही चव्हाटय़ावर निघते. त्या वेळी ही मंडळी कुठे असतात? असा खोचक प्रश्नही विचारला जात आहे. प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्या इज्जतीचा विचार करायचा व आपले सर्व प्रश्न विसरून त्यांच्या पाठीशी उभे राहायचे, हे किती दिवस चालू ठेवायचे? आमच्या इज्जतीचा विचार करीत नसाल, तर आम्हाला तरी तो केला पाहिजे, अशी चर्चा उघडपणे होत असल्याने निलंगेकर व चव्हाण या दोघांचीही ‘इज्जत’ मात्र पणाला लागली आहे.