करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये मोदींनी भाजपाची सत्ता नसणाऱ्या राज्यांवर इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन निशाणा साधलाय. नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने कर कमी केल्यानंतर काही राज्यांनी कर कपात करुन सामान्यांना दिलासा दिला नाही असा टोला मोदींनी थेट महाराष्ट्राचा उल्लेख करत लागावला. या टीकेनंतर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या आवाहनाचा उलेख करत ठाकरे सरकारकडे इंधनावरील कर कमी करण्याची विनंती केलीय.

नक्की वाचा >> केंद्र सरकारकडून २६ हजार ५०० कोटींची जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर…; फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट सवाल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदी नेमकं काय म्हणाले?
“देशातील नागरिकांवर पेट्रोल डिझेलच्या दरांमुळे पडणारं ओझ कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक्साइज ड्युटी मागील नोव्हेंबरमध्ये कमी केली होती. केंद्राने विनंती केली होती की राज्यांनीही कर कमी करावा आणि त्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल असं पहावं. यानंतर काही राज्यांनी भारत सरकारच्या भूमिकेनुसार कर कमी केला. मात्र काही राज्यांनी आपल्या राज्यातील लोकांना याचा काही फायदा पोहचू दिला नाही. यामुळे या राज्यांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती इतर राज्यांपेक्षा अधिक आहेत. हा त्या त्या राज्यांमधील लोकांबरोबर अन्याय आहेच. पण याचा शेजारच्या राज्यांनाही तोटा होतो,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

आधी महाराष्ट्राचं नाव न घेता टीका
पुढे बोलताना, “जे राज्य कर कमी करतात त्यांना राजस्वाचा तोटा होता. कर्नाटकने कर कपात केली नसती तर त्यांना या सहा महिन्यात पाच हजार कोटींचं राजस्व मिळालं असतं. गुजरातनेही कर कमी केले नसते तर त्यांना साडेतीन चार हजार कोटींचं राजस्व अधिक मिळालं असतं. मात्र काही राज्यांनी आपल्या नागरिकांच्या भल्यासाठी राज्य सरकारकडून आकारल्या जाणाऱ्या कराची टक्केवारी कमी केली. सकारात्मक पावलं उचललं. गुजरात आणि कर्नाटकच्या शेजारच्या राज्यांनी करामध्ये कपात न करता साडेतीन हजार कोटींपासून पाच साडेपाच हजार कोटींपर्यंत अतिरिक्त राजस्व कमावलं,” असं पंतप्रधानांनी म्हटलं.

विरोधी पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांचा केला उल्लेख
“नोव्हेंबर महिन्यात व्हॅट कमी करण्याबद्दल चर्चा झाली, मी वनंती केलेली. मी कोणावर टीका करत नाही पण लोकांच्या भल्यासाठी प्रार्थना करतोय. त्यावेळी काही राज्यांना ऐकलं काही राज्यांनी ऐकलं नाही. आता अनेक राज्य ज्यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगण, झारखंड, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू या राज्यांनी ऐकलं नाही आणि नागरिकांवरील कराचं ओझं कायम राहिलं,” असंही मोदी म्हणाले. “या कालावधीमध्ये राज्यांनी किती रेव्हेन्यू कमवला यावर मी जाणार नाही. पण मी तुम्हाला विनंती करतो की जे मागील नोव्हेंबरमध्ये केलं नाही, त्याला सहा महिने उशीर झालाय. तरी तुम्ही तुमच्या राज्यातील नागरिकांना व्हॅट कमी करुन याचा फायदा लोकांपर्यंत पोहचवू द्या,” असं आवाहन मोदींनी केलंय.

एकत्र काम करण्याच आवाहन
“भारत सरकारकडे राज्यांकडून जो रेव्हेन्यू येतो त्यापैकी ४२ टक्के पुन्हा राज्यांकडे जातो. जागतिक संकटाच्या या कालावधीत माझं सर्व राज्यांना आवाहन आहे की कोऑप्रेटीव्ह फेड्रलिझमच्या भावनेनुसार एका संघाच्या रुपात आपण सर्वांनी काम करावं,” असंही पंतप्रधान म्हणाले आहेत.

फडणवीसांनी लगावला टोला
मोदींच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत फडणवीसांनी ट्विटरवरुन महाराष्ट्र सरकारला टोला लगावलाय. “एकमेकांना दोष देणं हे सोपं असतं आणि वाईट कामं लपवण्यासाठी फायद्याचं असतं मात्र त्यामधून सर्वसामान्यांना फायदा होत नाही. जेव्हा भारत सरकारने मागील नोव्हेंबरमध्ये इंधनावरील एक्साइज ड्युटी कमी केली आणि त्यांनी राज्यांनाही कर कपात करण्यास सांगितलं होतं. मात्र महाराष्ट्रासहीत भाजपाची सत्ता नसणाऱ्या राज्ये नफा कमवण्यात व्यस्त होती,” असा टोला मोदींचं हे भाषण शेअर करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय.

माझी नम्र विनंती आहे की…
“पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांना इंधनावरील कर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्राने तीन हजार ४०० कोटींहून अधिक नफा मिळवला आहे. तर मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे की त्यांनी यासंदर्भात तताडीने निर्णय घेऊन मराठी माणसासहीत महाराष्ट्रातील सर्व जनतेला दिलासा द्यावा,” असं फडणवीस म्हणाले. शिवसेना मराठी माणसाच्या मुद्द्यावरुन राजकारण करते अशी टीका यापूर्वी भाजपाने अनेकदा केलीय. त्याच संदर्भात फडणवीसांनी मुद्दा या ट्विटमध्ये मराठी माणूस असा हॅशटॅग खोचकपणे वापरलाय.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया…
दरम्यान, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. आज पंतप्रधानांनी करोनासंदर्भातील बैठकीत पेट्रोल व डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत असा आरोप केला, मात्र महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत जी सापत्न वागणूक दिली जात आहे त्यावर ठाकरेंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात ( डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. असे असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयामार्फत जारी करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या निवेदनात म्हटलंय.

तसेच, आज मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे हि वस्तुस्थिती नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

आज राज्य सरकार वारंवार राज्यातील आपत्तीच्या वेळी एनडीआरएफचे तोकडे निकष वाढवून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची मागणी केंद्राकडे करीत आलेली आहे, मात्र केंद्राने यावर काहीही पाऊले उचलली नाही. उलटपक्षी राज्याने विविध आपत्तीत निकषापेक्षा जास्त मदत करून दिलासा दिला आहे. तोक्तसारख्या चक्रीवादळात गुजरातला महाराष्ट्रापेक्षा जास्त मदत केली गेली. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा केवळ निर्णय घेतला नाही तर त्यांना ती मिळेल हे पाहिले. कोविड काळात सर्व दुर्बल, असंघटित क्षेत्रातील नागरिकांनाही आर्थिक साहाय्य केले. शिवभोजनसारखी थाळी मोफत दिली. आर्थिक आव्हानांना पेलत महाराष्ट्राने आपली जबाबदारी पार पाडली. संघराज्याविषयी बोलताना सर्व राज्यांना केंद्राकडून समान वागणूक मिळणे अपेक्षित आहे असेही मुख्यमंत्री म्हणतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My sincere request to cm govt of maharashtra to reduce taxes on fuel tweets devendra fadnavis scsg