माझा मुलगा भूषण देसाईने आज शिंदे गटात प्रवेश केल्याची घटना ही माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे असं म्हणत सुभाष देसाई यांनी या सगळ्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुंबईतील बाळासाहेब भवन या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांचा वारसा खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेच पुढे नेत आहेत असंही भूषण देसाईंनी यावेळी म्हटलं. ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जात असतानाच सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.ठाकरे गटाच्या वतीने पत्रक काढून सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटलं आहे सुभाष देसाईंनी?
“माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत आणि शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे.” – सुभाष देसाई, नेते, शिवसेना
असं पत्रक काढून सुभाष देसाई यांनी या राजकीय घडामोडीबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुभाष देसाई हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांचा मुलगा भूषण देसाई आज शिंदे गटात गेल्याने आता सुभाष देसाईही शिंदे गटात जाणार का? या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र सुभाष देसाईंनी यावर पत्रक प्रसिद्ध करून आपली भूमिका मांडली आणि आपण उद्धव ठाकरेंसोबतच आहोत तसंच यापुढेही असणार आहोत असंही त्यांनी सांगितलं.
नेमकी काय घडली घटना?
काय घडली घटना?
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. या ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर अनेक शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती अद्याप थांबत नाहीये. आता ठाकरे गटाला धक्का देणारी मोठी बातमी समोर येत आहे.ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
भूषण देसाईंनी शिंदे गटात गेल्यानंतर काय म्हटलं आहे?
“बाळासाहेब ठाकरे हेच माझे दैवत आहेत. बाळासाहेब आणि शिवसेना या दोन शब्दांना सोडून तिसरा शब्द माझ्यासमोर आलेला मला आठवत नाही. हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेबांनी महाराष्ट्रासाठी पाहिलेलं स्वप्न हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. ते वाढवत आहेत. यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. आम्ही आधीपासून एकमेकांबरोबर काम केलं आहे. मी एकनाथ शिंदे यांना जवळून काम करताना बघितलं आहे. त्यांच्या कामाचा वेग आणि त्यांची निर्णयक्षमता पाहून मी त्यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला.”