सावंतवाडी : जगभरात लोकप्रिय ठरणाऱ्या फ्लाय ३६० डहाणू व टीम मेंगलोर टीमच्या सदस्यांनी विविधांगी पतंगबाजीचे प्रदर्शन घडवत अलौकिक आनंदाची अनुभूती उपस्थितांना दिली. माझा वेंगुर्ले या संस्थेने सलग सहाव्या पतंग महोत्सवाचे यशस्वी आयोजन करत वेंगुर्ल्याच्या पर्यटन विकासाला नवी चालना दिली आहे. आज शनिवारी दुपारी चार वाजल्यापासून वेंगुर्ल्याचा समुद्रकिनारा आभाळात झेपावणाऱ्या विविध आकाराच्या पतंगांनी व्यापून गेले होते.
वेंगुर्ल्यातील सागरेश्वर व बागायत समुद्रकिनाऱ्यावर या पतंगबाजीचा नेत्रदीपक सोहळा साजरा केला जाणार आहे. माझा वेंगुर्लाच्या टीमने या महोत्सवाची तयारी पूर्ण केली आहे. उभादांडा ग्रामपंचायतीचे यासाठी सहकार्य माझा वेंगुर्लाला लाभले आहे. तर बागायतवाडी व सागरेश्वर येथील ग्रामस्थांनीही पतंग महोत्सवासाठी पुरेपुर सहयोग दिला आहे. टीम मेंगलोर व टीम फ्लाय ३६० डहाणूचे असंख्य सदस्य पतंगबाजीचे प्रदर्शन घडविण्यासाठी वेंगुर्लेत दाखल झाले आहेत. वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दीशा, वातावरण याचा अभ्यास जागा निवडण्यात आली होती.
सागरेश्वर किनाऱ्यावर पतंगप्रेमींची गर्दी व्हायला सुरूवात झाली. फ्लाय ३६९ डहाणू व टीम मेंगलोरच्या सदस्यांनी विविध आकारातील विविध रंगाचे नानातचे पतंग उड्डाणासाठी तयार ठेवले होते. पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते हवेत पतंग उडवून पतंग महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वेंगुर्ले पालिकेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, उभादांडा गावचे सरपंच नीलेश चमणकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, माझा वेंगुर्लाचे अध्यक्ष जनार्दन शेट्ये, कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर, सचिव राजन गावडे, माजी अध्यक्ष नीलेश चेंदवणकर, मोहन होडावडेकर, पत्रकार शेखर सामंत, अटल प्रतिष्ठान सावंतवाडीचे अध्यक्ष नकुल पार्सेकर, सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर, भेरा चित्रपटाचे निर्माता प्रसाद खानोलकर, कपिल पोकळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते सागरास नारळ अर्पण करण्यात आला.