स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात भाजपला मराठवाड्यात बसलेल्या फटक्याची कसर दुसऱ्या टप्प्यात काहीप्रमाणात भरून निघाली आहे. लातूर जिल्हय़ातील औसा, निलंगा, अहमदपूर व उदगीर नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये निलंगा निलंगा नगरपालिकेत भाजपने काँग्रेसचा गड उद्ध्वस्त करून पालिकेवर झेंडा फडकवला आहे. तर उदगीरमध्येही भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. निलंगा पालिकेत भाजपने १४ जागा जिंकल्या आहेत. याशिवाय, भाजपचे बाळासाहेब शिंगडे हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात भाजपला मराठवाडय़ात अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यामुळे लातूर जिल्ह्य़ात होणाऱ्या चार नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप व पालकमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांची कसोटी लागली होती. निलंगा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवून निलंगेकर यांनी या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. याशिवाय, उदगीर , औसा आणि अहमदपूर नगरपालिकांमध्येही भाजपला बऱ्यापैकी यश मिळाले आहे. उदगीरमध्ये आतापर्यंत एकूण ३८ जागांपैकी २० जागांचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये भाजप व काँग्रेसला प्रत्येकी ७, एमआयएमला ६ जागांवर विजय मिळाला आहे. औसा नगरपालिकेत २० पैकी १४ जागा जिंकत राष्ट्रवादीने काँग्रेसने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. औसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदीही राष्ट्रवादीचे अफसर शेख विजयी झाले आहेत. तर अहमदपूर नगरपालिकेतील एकूण २३ जागांपैकी ९ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. याठिकाणी बहुजन विकास आघाडीने ४ जागा जिंकल्या असून नगराध्यक्षपदीही त्यांच्याच अश्विनी कासनाले निवडून आल्या आहेत. याठिकाणी भाजपला सहा, शिवसेना २ आणि काँग्रेस २ जागांवर विजयी झाली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, एमआयएम, बहुजन विकास आघाडी आदींसह अपक्ष उमेदवारांमध्ये येथे चुरशीची लढत होत होती. लातूरमधील चारही पालिकांच्या निवडणुका जिंकण्याकरिता पालकमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी मेहनत घेतली होती. पहिल्या टप्प्यात मराठवाडय़ात मर्यादित यश मिळाल्याने भाजपने सावध पवित्रा घेतला होता. चारपैकी सध्या प्रत्येकी दोन पालिकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे येथील मतदार कोणाला कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले होते. तब्बल ३१ नगरपालिका जिंकून भाजपने आघाडी घेतली आहे. तर ५२ ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आले आहेत. भाजपपाठोपाठ २० नगरपालिका जिंकत काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. काँग्रेसचेही २२ ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आले. तर राष्ट्रवादी १७ नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. शिवसेना १६ नगरपालिकांसह शेवटच्या क्रमांकावर आहे. त्रिशंकू अवस्थेतील नगरपालिकांची संख्या तब्बल ३४ आहे.