कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे निर्विवाद वर्चस्व सोमवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले. नगरपंचायतीच्या १७ पैकी १३ जागा कॉंग्रेसला मिळाल्या आहेत. या निवडणुकीत राणेंविरुद्ध सर्वच राजकीय पक्ष एकत्र आले होते. तरीही मतदारांवर त्याचा प्रभाव पडल्याचे दिसत नाही. राणेंचा बालेकिल्ला असलेल्या या नगरपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी राणेंच्या पारड्यात आपले मत टाकल्याचे दिसून आले. निवडणुकीत शिवसेनेला ३ जागांवर, तर भारतीय जनता पक्षाला एक जागेवर यश मिळवता आले.
नव्यानेच स्थापित झालेल्या गुहागर आणि देवरुख नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत गुहागरमध्ये नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने १७ पैकी ११ जागांवर विजय मिळवून नगरपंचायतीमध्ये निर्विवाद बहुमत प्राप्त केले. याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाला ६ जागांवर विजय मिळवता आला.
देवरुखमध्ये शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या पारड्यात मतदारांनी आपला कौल दिला. १७ पैकी १२ जागांवर युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. पाच जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजय मिळवण्यात यश मिळाले. या नगरपंचायतीमध्ये आता युतीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झालाय.

Story img Loader