Nagar Panchayat Election Result 2022 updates: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे निकाल हाती आले आहेत. १०६ पैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. ९ नगरपंचायतींचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत.या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली असून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. भाजपाने २४ नगरपंचायती जिंकल्या असून सर्वाधिक ३८४ जागा मिळवल्या आहेत. २०१७ मध्ये भाजपाकडे नगरपंचायतीत ३४४ सदस्य होते
सध्याच्या निकालाबद्दल बोलायचं गेल्यास भाजपा (३८४ ) पहिल्या क्रमांकावर असून यानंतर अनुक्रमे राष्ट्रवादी (३४४), काँग्रेस (३१६) आणि शिवसेनेचा (२८४) क्रमांक आहे. मात्र २०१७ च्या निकालाशी तुलना केली तर भाजपाच राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरत असून राष्ट्रवादी दुसऱ्या, शिवसेना तिसऱ्या आणि काँग्रेस चौथ्या क्रमांवर फेकला गेला. भाजपाने सर्वाधिक नगरपंचायती जिंकतानाच सदस्य संख्येतही पहिला क्रमांक मिळवला आहे.
Nagar Panchayat Election Result 2022: निकालाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर
महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री असूनही शिवसेना मात्र पिछाडीवर राहिली आहे. शिवसेनेने १४ नगरपंचायतींमध्ये विजय मिळवला असून २८४ जागा मिळवल्या आहेत. २०१७ मध्ये शिवसेनेची सदस्यसंख्या २०१ होती. त्या तुलनेत शिवसेनेला यावेळी चांगलं यश मिळालं आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीने २५ नगरपंचायती आणि ३४४ जागा जिंकल्या आहेत. २०१७ मध्ये राष्ट्रवादीचे ३३० सदस्य होते. त्यामुळे यावेळी त्यांच्या मतांमध्ये घट झाल्याचं स्पष्ट आहे. सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. २०१७ मध्ये ४२६ सदस्यसंख्या असणारी काँग्रेस ३१६ वर पोहोचली आहे. काँग्रेसने १८ नगरपंचायती जिंकल्या आहेत.
भाजपा क्रमांक एकचा पक्ष – चंद्रकांत पाटील
नगरपंचायत निवडणुकीत भाजपा क्रमांक एकचा पक्ष झाल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. २४ नगरपंचायतीमध्ये भाजपाची सत्ता आली असून सहा ठिकाणी भाजपाप्रणीत आघाडी सत्तेत आल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेतही भाजपाचं वर्चस्व राहील असं ते म्हणाले आहेत.
भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहील – देवेंद्र फडणवीस
मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील. भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली.सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे असं विधासनभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो! महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणार्या सर्व मतदारांचेही मन:पूर्वक आभार मानतो! कितीही पक्ष एकत्र आले तरी या देशातील जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्त्वावर विश्वास ठेवते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मोदीजींचे नेतृत्त्व आणि आपल्या कार्यकर्त्यांचे परिश्रम याचेच हे यश आहे असंही ते म्हणाले आहेत.
“वडिलांचं स्वप्न पूर्ण करताना जनतेच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्यांना हा धडा “
“नगरपंचायत निवडणूकीत भाजपाच 1 नंबर… दोन नंबरी कामं करणारे 2 नंबरवर राहिले… शिवसेनेचे 3 तेरा वाजले..मुख्यमंत्री असूनही सेना तिस-या नंबरवर फेकली गेली…तर लिंबु टिंबू काँग्रेस गाळात गेलीय… वडिलांचं स्वप्न पूर्ण करताना जनतेच्या स्वप्नांचा चुराडा करणा-यांना हा धडा आहे,” अशी टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.