कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं असून पक्षाचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागा जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे शेतकरी विकास पॅनल ६ आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले आहेत.
रोहित पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली असून म्हटलं की, “मी सर्वांचा आभारी आहे. सर्वसामान्यांनी ही निवडणूक हाती घेतली होती. राष्ट्रवादी पक्षावर झालेला अन्याय असो किंवा येथील प्रश्न असतील ते घेऊनच आम्ही निवडणूक लढलो आणि लोकांनी आम्हाला विजय मिळवून दिला. हा विजय सर्वसामान्यांचा आहे”.
“आम्ही लोकांसमोर विकासकामं घेऊन उतरलो होतो. लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी समजून घेत होतो. लोकांचा आमच्यावरचा विश्वास वाढला आणि त्यामुळेच हा विजय झाला,” असं रोहित पाटील म्हणाले आहेत.
निकालाच्या दिवशी माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आबांच्या आणि राष्ट्रवादी पक्षाच्या विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्याने आम्हाला सत्तेत बसवलं आहे. आम्हा सर्वांना आबांची आठवण येत आहे. वडील ऐवजी चुकून बाप असा उल्लेख झाला होता. त्याच भाषणाचा धागा पकडत बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं होतं. आबांनी तसंच सुमनताईंच्या नेतृत्वात केलेलं काम लोकांनी पाहिलं असून त्यातूनच लोकांनी हा आशिर्वाद दिला आहे”.
आम्ही सर्वच कार्यकर्ते आबांची आठवण काढत आहोत असं यावेळी ते म्हणाले. “आबा गेले तेव्हा मी दहावीत होतो. फारसा सहवास लाभला नाही, पण आज ते असते तर खूश झाले असते,” अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
रोहित पाटील यांनी निवडणुकीत केलेला प्रचार चर्चेचा विषय ठरला होता. या निवडणुकीनंतर माझा बाप तुम्हाला आठवल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यांच्या भावनिक सादेला जनतेने चांगला प्रतिसाद दिला असून विजय मिळवून दिला आहे. यानिमित्ताने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्याची चर्चा आहे.
रोहित पाटील यांनी चांगली कामगिरी केली यामुळे त्यांना लोकांनी सत्ता दिली असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.