आगामी नगर पंचायत निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर दापोलीत आघाडी आणि युती होण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह असले तरी आघाडीबाबतच्या निर्णयावरच युतीचे भवितव्य अवलंबून आहे. सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरू असून शिवसेना-भाजपमधील वाद मात्र शिगेला पोचल्याचे चित्र आहे. साहजिकच आघाडी झाल्यास त्याचा संभाव्य फटका सहन करण्याची मानसिकता युतीमधील पक्षांत मात्र दिसत नाही. त्यामुळे हे चारही पक्ष एकमेकांच्या राजकीय भूमिकांवर लक्ष ठेवून आहेत.

काही महिन्यांपूर्वी मंडणगड नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी महाआघाडी पॅटर्न राबवून शिवसेना आणि भाजपला जोरदार धक्का दिला. हाच पॅटर्न दापोलीत राबवून येथेही त्याच निकालाची पुनरावृत्ती करण्याचे त्यांनी सूतोवाच केले होते. पण काँग्रेसनेच राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवत निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भाई जगताप यांनीही त्यास दुजोरा दिल्याने संजय कदम यांचे महाआघाडीचे स्वप्न सध्या धूसर झाले आहे. परिणामी दोन्ही पक्षांनी नगर पंचायतीच्या सर्वच्या सर्व म्हणजे १७ जागांसाठी उमेदवार निश्चितीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. स्वतच्या अस्तित्वाबाबत साशंक असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र आघाडी करण्याबाबत मतभिन्नता तीव्र झाल्याचे सध्या चित्र आहे.

दुसऱ्या बाजूला दापोलीत युतीचा मार्ग तर अतिशय बिकट झालेला आहे. आतापर्यंत मोठय़ा भावाच्या भूमिकेत राहणाऱ्या शिवसेनेचा मोठेपणा यंदा भाजपने धुडकावून लावला आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच सर्व जागांसाठी तयारी करण्याचे संकेत देऊन शिवसेनेला पेचात पाडले आहे. जागावाटपाच्या मुद्दय़ावर भाजपला आतापर्यंत मिळालेले दुय्यम स्थान हेच या संघर्षांचे मुख्य कारण आहे. मात्र मागील नगर पंचायत कार्यकाळात भाजपने सत्तास्थापनेमध्ये शिवसेनेला पािठबा दिला होता. पण निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर या दोन्ही पक्षांतील मतभेद उघड झाले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शिवसेनेला स्वतचे अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपच्या कलाने समझोता करावा लागेल. मात्र ही राजकीय तडजोड आघाडीच्या निर्णयावरच अवलंबून राहणार आहे, असा अंदाज राजकीय निरीक्षकांत व्यक्त होत आहे.