आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे नगर मार्गे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडी व पालख्या, टाळमृदुंगाचा नाद, हरिनामाचा गजर, खांद्यावर घेतलेल्या भगव्या पताका, वारकऱ्यांचे नगरकरांकडून होत असलेले जंगी स्वागत, यामुळे नगर शहरातील वातावरण सध्या भक्तिमय झाले आहे. अनेक वर्षांच्या परंपरेतून शहरातील तरुण मंडळांचे, संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांचे वारकऱ्यांशी ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत.
नाशिक, औरंगाबाद या लगतच्या जिल्हय़ांसह, नगर जिल्हय़ाच्या विशेषत: उत्तर भागातून परंपरेप्रमाणे अनेक देवस्थान, संस्थानच्या दिंडय़ा आषाढी वारीसाठी नगर शहरात मुक्काम करून पंढरपूरकडे रवाना होत असतात. नगर शहर व परिसरातूनही दिंडय़ा, पालख्यांसह वारकरी जात असतात. अशा दिंडय़ांचे सध्या शहरातून मार्गक्रमण होत आहे. देवगड देवस्थान, संत निवृत्तिनाथांची पालखी, गोरक्षनाथ गडावरील दिंडी, नाशिकच्या संत जनार्दन स्वामी आश्रमाची दिंडी, शिर्डीची साईबाबा पादुका पालखी अशा अनेक दिंडय़ांनी आपली शिस्तबद्धता पाळत नगर मार्गे मार्गक्रमण केले. नगरमधूनही वीर हनुमान सेवा पालखी, भैरवानाथ दिंडी आदींचे प्रस्थान झाले.
दिंडय़ांचे प्रमुख दरवर्षी आपले वेळापत्रक नगरमधील मंडळांना कळवत असतात, त्यानुसार मंडळांचे कार्यकर्ते वारकऱ्यांच्या स्वागताची तयारी करत असतात. त्यांचा मुक्काम, चहा, नाश्ता, जेवण, औषधोपचार यांची व्यवस्था करत असतात. मुक्कामात वारकरी भजन, कीर्तन, प्रवचन यासह मनोरंजनाचे कार्यक्रमही केले जातात. अनेक संस्था, संघटना या वारकऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शिधाही देतात. त्यातून वारकरी व मंडळांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये हृद्य नातेही निर्माण झाले आहे.
रस्त्याने हरिनामाचा जप, भजन-कीर्तन करत जाताना दिंडय़ांतील वारकरी शिस्तही पाळत असतात. सध्याच्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर वारकऱ्यांमध्ये उत्साहाची कमी जाणवत होती. या दिंडय़ातील वारकऱ्यांमध्ये स्वच्छताविषयक जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेचे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण मंडळाच्या स्वयंसेवकांची पथकेही सहभागी झाले आहेत.
दिंडय़ांच्या आगमनाने नगरकर भक्तिमय
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे नगर मार्गे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडी व पालख्या, टाळमृदुंगाचा नाद, हरिनामाचा गजर, खांद्यावर घेतलेल्या भगव्या पताका, वारकऱ्यांचे नगरकरांकडून होत असलेले जंगी स्वागत, यामुळे नगर शहरातील वातावरण सध्या भक्तिमय झाले आहे.

First published on: 20-07-2015 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagarkar devotional due to arrival of palkhi