नाटक व सिनेमात नाव कमावल्यानंतरही ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर अस्सल नगरकर होते. हे नाते त्यांनी जाणीवपूर्वक जोपासले होते. वृद्धापकाळ ते नगरलाच व्यतीत करणार होते. नगरमध्ये नवे घरही त्यांनी घेतले होते, मात्र ते आणि नगरकर असे दोघांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले. त्यांच्या निधनाचे वृत्त नगरमध्ये धडकताच त्यांचे मित्र, नाटय़कलावंतांनी त्यांच्या नगर येथील निवासस्थानी धाव घेतली. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.    
चित्रपट अभिनेते मिलिंद शिंदे- अमरापूरकर सामाजिक भान असलेले कलावंत होते. त्या वेळच्या नगरसारख्या छोटय़ा गावातून एसटीच्या लाल डब्यात बसून मुंबईसारख्या कोणाला भेटायचे हे माहीत नसताना, अशा काळात त्यांनी नाव कमावले. नव्या कलावंतांना त्याचे नेहमीच प्रोत्साहन होते. दिसण्यास सामान्य वाटणारे कलावंतही, देखणेपण किंवा हीरोसारखे रूप नसताना उत्तुंग यश मिळवू शकतात हे त्यांनी दाखवून दिले. चित्रपटसृष्टीत नगर त्यांच्या नावाने अमरापूरकरांचे गाव म्हणून ओळखले जात होते, हे मोठे अभिमानास्पद आहे. मी जेव्हा त्यांना मुंबईत भेटत असे तेव्हा ते नगरबद्दल भरभरून बोलत, परंतु या बोलण्यातही नगर तसेच राहिले याची खंतही असे. कलावंत पैसा कमावतात, घर उभारतात, स्थैर्य मिळवतात, मात्र यापलीकडे जाऊन त्यांच्यासाठी सांस्कृतिक आरोग्य आवश्यक असते, याची जाणीव त्यांना होती. त्यातूनच त्यांनी भूमिका करणे बंद केले तरी भूमिका मांडणे सुरू ठेवले होते.
अमरापूरकरांचे मित्र मकरंद खेर- कॉलेजच्या प्री-डिग्रीपासून सुरू झालेली आमची मैत्री पन्नास वर्षे टिकून होती. माझ्यापेक्षा तो दीड वर्षांनी लहानच होता. त्याची प्रकृती गंभीर आहे हे माहीत असूनही त्याचा मृत्यू अनपेक्षितच होता. आता तो परत येणार नाही, ही कल्पनाच त्रासदायक वाटते. १९६७ मध्ये मी दिग्दर्शित केलेल्या ‘पेटलेली अमावास्या’ या एकांकिकेत त्याने प्रथम काम केले. त्या वेळी सूर जुळल्याने आम्ही दरवर्षी एकतरी नाटक, एकांकिका सादर करायचो. यूथ फेस्टिव्हलमध्येही आमचा सहभाग असायचा. कॉलेजमध्ये ‘नाटय़ पराग’ ही चळवळ सुरू केली होती. नंतर ‘इंटिमेट थिएटर’ नावाची चळवळही सुरू केली होती.
ज्येष्ठ नाटय़कलावंत अनिल क्षीरसागर- गेल्या ३२ वर्षांची आमची ‘असोसिएशन’ त्याच्या एक्झिटमुळे संपली. सदाशिव माझ्यापेक्षा लहान होता, मात्र अभ्यासूपणा, समृद्ध अनुभव, सामाजिक जाणीव यामुळे तो माझा मार्गदर्शकच होता. हौशी व व्यावसायिक रंगभूमीवर मी व त्याने बारा वर्षे एकत्र काम केले. ‘ती फुलराणी’, ‘निष्पाप’ ही नाटके व ‘अनुभूती’ हा हिंदी चित्रपट आम्ही एकत्र केला. त्या वेळी नगरचेच वातावरण मुंबईत निर्माण व्हायचे. अभ्यासूपणा व वाचन यामुळे त्याचे जग सजग झाले होते. चित्रपट आणि नाटक या दोन्ही माध्यमांकडे तो अत्यंत गांभीर्याने पाहात होता. तो आणि सुधाकर निसळ या दोघांनी राज्य नाटय़ स्पर्धेत एकत्रच नगरचा दबदबा निर्माण केला होता. त्यामुळेच नगर म्हटले की स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारच असेच चित्र असायचे. अमिताभ असो की धर्मेन्द्र यांच्यासमोरही तो कधी नवखा वाटला नाही. श्याम बेनेगल यांच्या ‘भारत एक खोज’ मालिकेत त्याने केलेली टिळकांची भूमिका अविस्मरणीय अशीच होती. यापूर्वी व नंतरही ती कोणी करू शकले नाही. तीन तासांचे भाषण सदाशिवने खंड न पडू देता पूर्ण केले. कोणत्याही एका भूमिकेत बंदिस्त न राहता, आपल्या अभिनयाची अनेक दालने त्यांनी उघडली. माझे मुंबईतील वास्तव्य त्याच्यामुळेच सुखी झाले.
नाटय़ परिषदेच्या नगर शाखेचे अध्यक्ष सतीश लोटके- सन २००३ मध्ये नगरला झालेल्या ८३ व्या नाटय़संमेलनात त्यांनी येथील रंगकर्मीबरोबर उत्साहाने खांद्याला खांदा लावून काम केले होते. मामा तोरडमल आणि अमरापूरकर या दोघांनी नगरचे नाव मोठे केले. त्यांचाच आदर्श घेऊन नगरचे कलावंत काम करतात. येथील कलावंतांना एकच खंत आहे, की नगरमध्ये नाटय़गृह उभे राहिले हे त्यांना पाहता आले नाही.
कवी प्रकाश घोडके- चित्रपटांसाठी गाणी लिहिण्याची प्रथम संधी मला सदाशिव अमरापूरकर यांच्यामुळेच मिळाली. ‘जन्मठेप’, ‘पैंजण’ची गाणी लिहिण्यासाठी त्यांनी मला मुंबईत बोलावले होते. मोठा कलावंत असूनही ते किती साधे आहेत, याचा अनुभव मला त्यांचा पाहुणचार घेताना मिळाला. संगीतकार नौशाद केवळ एकाच मराठी गाण्याच्या संगीताच्या वेळी उपस्थित राहिले ते ‘जन्मठेप’ चित्रपटावेळी. तेही केवळ अमरापूरकर यांच्यामुळे. नगरमधून निघणाऱ्या ‘आदिम’ हस्तलिखिताच्या मासिकाच्या संपादक मंडळावर ते होते. त्यातील माझ्या कविता वाचून त्यांनी मला संधी दिली. विचारसरणी कोणतीही असो, त्यातील सामाजिक भानाला ते महत्त्व देत, त्यामुळेच अनेकदा डाव्या चळवळीला त्यांचा हातभार लागला.
नाटय़लेखक श्रीनिवास भणगे- सन १९७३-७४ मध्ये मी बसवलेल्या ‘काही स्वप्नं विकायची आहेत’ या नाटकातूनच अमरापूरकर यांचा व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश झाला. राज्य नाटय़ स्पर्धेत नाटकाला व अमरापूरकर यांना पारितोषिके मिळाली. त्याचे काही व्यावसायिक प्रयोगही झाले. त्यांचा नगर-पुणे-मुंबई असा स्ट्रगलचा काळ मी पाहिला आहे. पुण्यात तो माझ्याचकडे यायचा. झोकून देऊन काम करण्याची त्यांची पद्धत पूर्वीपासून आहे तशीच राहिली. नशिबाने चांगली साथ दिली तरी कोणते नाटक करावे, त्यासाठी कोणती टीम असावी, त्यासाठी कोणते व्यावसायिक संपर्क असावेत याची त्यांना चांगली जाण होती. विचारांबाबत ते अत्यंत जागरूक होते.
अमरापूरकरांचे मित्र प्रा. मंगेश जोशी- गेली चाळीस वर्षांची आमची मैत्री आम्ही जपली. आयुष्याची सायंकाळ, वृद्धापकाळ एकत्र घालवण्यासाठी शेजारी शेजारी राहून, गप्पाटप्पा मारत जगण्याचे मी, अमरापूरकर व मकरंद खेर अशा तिघा मित्रांचे स्वप्न होते. त्यासाठी आम्ही जागाही (धर्माधिकारी मळा, फुलारी पंपाशेजारी) घेतल्या होत्या. त्याने त्यासाठी घराला लिफ्टही बसवून घेतली होती. परंतु हे स्वप्न आता उद्ध्वस्त झाले. प्रत्येक भूमिका समरसून करणाऱ्या या हरहुन्नरी व जातिवंत कलावंताने चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. ‘झेडपी’, ‘जन्मठेप’, ‘आरं, आरं आबा आता तरी थांबा’ हे चित्रपट आणि ‘कुलवधू’ ही मालिका आम्ही एकत्र केली, त्या वेळी चित्रपटसृष्टीतील त्याचा दबदबा मला समजला.
ज्येष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी-सदाशिव अमरापूरकर यांची जरी जगाला ओळख दिग्गज कलावंत अशी असली तरी ते माझ्यासाठी ‘आमचे तात्या’, स्नेही, मार्गदर्शक, गुरू होते. माझ्या उमेदीच्या काळात त्यांनी मला खूपच मदत केली. त्यांच्या शिकवणीमुळेच मी आजही नाटय़क्षेत्रात काम करू शकत आहे.

Story img Loader