उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीच्या शुल्कात कपात करण्याचा निर्णय त्वरित लागू करण्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीची बैठक घेण्याचे तसेच बहिस्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य विद्यापीठामार्फत पुरवण्याचे लेखी आश्वासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिल्यानंतर युगंधर युवा प्रतिष्ठान व पदवीधर विकास मंचने पुण्यात विद्यापीठासमोर बुधवारपासून सुरू केलेले उपोषण स्थगित केले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप ढाकणे व मंचचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांनी भरलेल्या शुल्काचा परतावा, बहिस्थांचा प्रवेश, परीक्षाशुल्कात करण्यात येणारी कपात यासंदर्भातही व्यवस्थापन समितीच्या सभेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिल्याने पुढील बैठकीपर्यंत आंदोलन स्थगित ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
या आंदोलनास पाठिंबा म्हणून अमोल औटी, विकास कानडे, शरद कथने, दीपक पवार, वैभव दळवी, अनिल शिंदे, शीतल बेंद्रे आदींनी साखळी उपोषण केले. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने आंदोलनास पाठिंबा देत साखळी उपोषण केले. या मागण्यांसंदर्भात कुलगुरूंनी पूर्वीही आश्वासन दिले होते, परंतु त्याचे पालन झाले नाही, त्यामुळे उपोषण करण्यात आल्याचे संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.

Story img Loader