अपयश हीच यशाची पहिली पायरी असून सलग तीनदा अपयशी ठरूनही खचून न जाता नोकरी सांभाळत रोज सलग पाच तास अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर चौथ्या प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिला व देशात चौदावा येण्याची कमाल करता आली, असे मत चंद्रपूरच्या डॉ.विपीन विठोबा इटनकर याने लोकसत्ताजवळ बोलतांना व्यक्त केले.
मूळचा चंद्रपूरकर असलेला व सध्या चंदीगढ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देत असलेल्या डॉ. विपीन इटनकरच्या चेहऱ्यावर काल गुरुवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर होताच हास्य फुलले. तो महाराष्ट्रातून प्रथम, तर देशातून चौदावा आल्याची बातमी सर्व प्रमुख वाहिन्या व आजच्या वर्तमानपत्रात झळकली होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे खऱ्या अर्थाने यशाचे शिखर गाठणे आहे. त्यामुळे यशोशिखर गाठण्याचा आनंद आयुष्यातला सर्वोच्च क्षण असला तरी त्यामागे कठोर परिश्रमाची पाश्र्वभूमी आहे.
यशाचा मार्ग खडतर आणि कठोर परिश्रमाचा असतो, याचा अनुभव आपण घेतला आहे. यशामुळे माणसाच्या डोक्यात हवा शिरते, तसेच अपयशामुळे माणूस खचून जातो, निराशेच्या गर्तेत स्वत:चे अस्तित्वच हरवून बसतो. आयुष्यात आपणही अपयशाच्या या खाईत ढकलले गेलो होतो. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा सलग तीन वेळा नापास झाल्यानंतर हा आपला मार्ग नाही, असे वाटले होते, परंतु आई शारदा व पत्नी डॉ.शालिनी या खंबीरपणे पाठिशी उभ्या राहिल्या. अपयश हीच यशाची पहिली पायरी असून अपयशाने कधी खचायचे नाही आणि यशाने माजायचे नाही, हा मंत्र देत त्यांनी माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात सलग पाच तास अभ्यास करण्यावर भर दिला आणि त्याचा सकारात्मक निकाल डोळ्यासमोर आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यास चौफेर ज्ञान व पाच तासाच्या अभ्यासाचे गमक कारणीभूत असले तरी आई, बहीण आणि पत्नीची जिद्द सुध्दा कारणीभूत असल्याचे डॉ.विपीन याने लोकसत्ताशी बोलतांना सांगितले.
डॉ.विपीनचे वडील येथील महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्टमध्ये उपव्यवस्थापक होते, तर आई गृहिणी आहे. डॉ.विपीन याने पहिल्या वर्गापासून बारावीपर्यंत येथील विद्या निकेतन कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेतले. बारावीत अवघ्या काही गुणांनी गुणवत्ता यादीत येण्यापासून वंचित राहिलेल्या विपीनने २००८ मध्ये नागपूरच्या मेयो येथून वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी पूर्ण केली.  त्याला एम.डी. करायचे होते, परंतु २०१० मध्ये वडील विठोबा इटनकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी विपीनवर आली. त्यामुळे एम.डी.चा विचार न करता थेट चंदीगडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी पकडली. तेथेच डॉ.शालिनी हिच्याशी विवाह झाला. विवाहानंतर पत्नी व आईने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यावी, असे सुचविले. त्यानंतरच युपीएससीच्या तयारीला लागलो. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी चौफेर ज्ञान अवगत करावे, असाही सल्ला त्याने दिला. विपीनची बहीण विशाखा हिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून ती सुध्दा पुण्यात युपीएससीची तयारी करीत असल्याचे त्याने सांगितले.