Nagpur Clashes Live Updates: नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांमधील वादानंतर हिंसक संघर्ष झाला, ज्यामुळे तोडफोड आणि जाळपोळ झाली. अनेक वाहने जाळण्यात आली असून, दगडफेकीच्या वृत्तांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Live Updates
13:49 (IST) 18 Mar 2025

नागपूर हिंसाचारावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

नागपूर हिंसाचारावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले, “ही खूप दुःखद बातमी आहे. लोकांनी दगडफेक टाळावी. हे खूप वाईट आहे. जर काही अडचणी असतील तर त्या रस्त्यावर नाही तर चर्चेतून सोडवता येतात.”

13:28 (IST) 18 Mar 2025

Nagpur Violence Updates : दंगलीनंतर विहिंपचे प्रवक्ते म्हणतात, जिहादींवर कठोर …

नागपूर दंगल प्रकरणाबाबत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी नुकतीच आपली प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरमध्ये अफवा पसरवणाऱ्या आणि हिंसाचार करणाऱ्या जिहादींवर कडक कारवाई करावी आणि औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी पूज्य धना जी, संता जी, छत्रपती राजाराम महाराज जी यांचे स्मारक बांधावे अशी मागणी केली.

सविस्तर बातमी…

13:06 (IST) 18 Mar 2025

Nagpur Violence Updates : नागपूर शहरात तणावपूर्ण शांतता, १५० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करून अटक

नागपूर : पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपुरातील अर्ध्या अधिक भागात संचारबंदी जाहीर केली आहे. तरीही शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असल्याची स्थिती आहे.

सविस्तर बातमी…

12:34 (IST) 18 Mar 2025

Nagpur Violence Updates : दंगलीच्या सावटातही नागपूर महापालिका कर्मचारी रस्त्यावर, पहाटेपर्यंत संपूर्ण परिसर…

नागपूर : भीतीयुक्त वातावरणातही नागपूर महापालिकेचे सफाई कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आणि पहाटेपर्यंत त्यांनी या संपूर्ण रस्त्यावरील दगड आणि काचा उचलून रस्ता स्वच्छ केला.

सविस्तर बातमी…

12:22 (IST) 18 Mar 2025

DCM Eknath Shinde : “नागपुरातील घटना पूर्वनियोजित कट?”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संशय, म्हणाले, “या भागात रोज…”

नागपुरात घडलेल्या हिंसाचारामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासाठी झालेल्या आंदोलनाला वेगळं वळण लागलं अन् १७ मार्च रोजी रात्री नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून पोलीस आणि इतर काही नागरिक जखमी झाले आहे. दरम्यान, ही घटना पूर्वनियोजित होती, असा संशय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.

सविस्तर वृत्त वाचा

12:10 (IST) 18 Mar 2025

Nagpur Violence Updates : दोन पोलीस उपायुक्तांसह २२ जखमींना तातडीने…

नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री (१८ मार्च २०२५) दोन गटात संघर्ष पेटल्याने तणाव निर्माण झाला होता. जमावाने एका उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला केला असून इतरांवर दगड व इतर वस्तू फेकल्याने अनेक पोलीस व नागरिक जखमी झाले.

सविस्तर बातमी…

11:52 (IST) 18 Mar 2025

नागपूरमध्ये दोन हजाराहून अधिक पोलिसांची गरज, २३४ कोटींचा अपेक्षित खर्च…

नागपूर लोकसंख्या वाढत असल्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव आहे. शहरात संघ मुख्यालय, दीक्षाभूमी, विमानतळ, मुख्यमंत्र्यांचे निवास यासह विविध महत्त्वाची स्थळे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शहरात नवे पोलिसांची पदे मंजूर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, अशी विनंती पोलीस आयुक्तांनी गृह विभागाकडे केली आहे.

सविस्तर बातमी…

11:45 (IST) 18 Mar 2025

Nagpur Violence: नागपूरमध्ये सध्या कशी आहे परिस्थिती? पोलीस आयुक्त म्हणाले, “हिंसाचार करणाऱ्यांची…”

Nagpur Violence Updates: नागपूरमध्ये काल झालेल्या हिंसाचारानंतर शहरात सध्या काय परिस्थिती आहे, याबद्दल नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंदर सिंघल यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, “नागपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असून शहरात सध्या शांतता आहे. या हिंसाचाराप्रकरणी आम्ही ५० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना आम्ही शोधून काढत आहोत.”

डॉ. रविंदर सिंगल यांनी पुढे सांगितले की, “या घटनेत ३३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी चांगले काम केले आहे. हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवली जात असून, त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर सर्व संबंधित कलमे लागू केली जाणार आहेत. नागपुरात पोलीस आणि इतर सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नागपूरच्या काही भागात संचारबंदी लागू आहे. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून संबंधित लोकांसोबत बैठक घेण्यात येणार आहे.”

11:26 (IST) 18 Mar 2025

Nagpur Violence Updates : पालकमंत्री बावनकुळेंची नागपूरच्या दंगलीवर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “घटनेचा मोरक्या कोण?….”

विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी बावनकुळे यांना नागपूरची परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठवले आहे. बावनकुळे यांनी विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

सविस्तर वाचा…

11:11 (IST) 18 Mar 2025

Nagpur Violence Updates : विजय वडेट्टीवार थेटच म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी ‘ त्या’ मंत्र्याला आवरले असते तर दंगल झाली नसती”

गेले चार महिने सत्तेतील एक मंत्री दोन समाजामध्ये दरी निर्माण करेल असे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्या मंत्र्यांला वेळीच आवर घालण्याची आवश्यकता होती. नागपूरच्या दंगलीनंतर विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

सविस्तर बातमी…

10:53 (IST) 18 Mar 2025

नागपूरच्या दंगलीबाबत भाजप आमदारांच्या मोठा आरोप, म्हणाले…

नागपूरच्या महल परिसरातील घरे आणि वाहने जाळण्याबाबत आमदार प्रवीण दटके मोठे विधान केले आहे.

सविस्तर बातमी…

10:30 (IST) 18 Mar 2025

दंगलीमुळे नागपुरातील जनजीवन विस्कळीत, शाळांना सुट्टी जाहीर

नागपूर : दोन गटांत संघर्ष पेटल्यामुळे महालमधील झेंडा चौकात तणाव निर्माण झाला. एका गटातील युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. हा सर्व प्रकार सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला. याचा परिणाम शहरातील सामान्य जनजीवनावर झालेला आहे. शहराच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.

सविस्तर वाचा

10:30 (IST) 18 Mar 2025

नागपूर: महालमधील जाळपोळ, दगडफेक, तोडफोडीचे पडसाद शहरातील अन्य भागातही…

नागपूर : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबची कबर हटवण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास दोन गटात संघर्ष पेटला. जवळपास चार तास महाल परिसर, चिटणीस पार्क परिसर यासह अन्य ठिकाणी तुफान दगडफेक, तोडफोड,  रस्त्यावर जाळपोळ आणि नारेबाजी करण्यात आली. 

सविस्तर वाचा

10:04 (IST) 18 Mar 2025

Nagpur Violence: “नागपूरमधील हिंसाचार नियोजित असल्याचा संशय”, गृह राज्यमंत्र्यांचे मोठं वक्तव्य

सोमवारी रात्री नागपूरमध्ये हिंसाचार झाला असून, महाल परिसरात दगडफेक, वाहनांची तोडफोड आणि आजूबाजूच्या परिसरात जाळपोळ झाली. या घटनेपासून शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे.

याबाबत बोलताना राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी ही घटना नियोजित असल्याचा संशय असल्याचे म्हटले आहे. यासाठी कुठे आणि कोणी नियोजन केले याचा तपास सुरू करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

09:55 (IST) 18 Mar 2025

Nagpur Violence: नागपूर हिंसाचारप्रकरणी ६० हून अधिक आरोपी ताब्यात, पोलीस आयुक्तांची माहिती

नागपूरमधील दंगल, तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणी ६० हूनजणांना ताब्यात घेण्यात आले असून, याप्रकरणी ४ एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिली आहे. या दंगलीत १५ पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले.

09:20 (IST) 18 Mar 2025

Nagpur Violence: “धारदार शस्त्रे, स्टिक्स आणि बाटल्या…”, नागपूर हिंसाचाराबाबत प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय सांगितलं?

नागपूरातील तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेवर बोलताना हंसापुरी भागातील एका प्रत्यक्षदर्शी स्थानिक महिलेने सांगितले की, “एक जमाव येथे आला, त्यांचे चेहरे स्कार्फने झाकलेले होते. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे, स्टिक्स आणि बाटल्या होत्या. त्यांनी गोंधळ सुरू केला, दुकानांची तोडफोड केली आणि दगडफेक केली. यावेळी त्यांनी वाहनेही जाळली.”

08:30 (IST) 18 Mar 2025

Nagpur Violence:मुख्यमंत्री फडणवीस यांचं शहर जळत असेल तर यापेक्षा वाईट काहीही नाही: यशोमती ठाकूर

Nagpur Violence: नागपूर हिंसाचारावर बोलताना काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या, “नागपूरमध्ये जे घडले ते लज्जास्पद आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर जळत असेल तर यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. आपले लक्ष महाराष्ट्राला पुढे नेण्यावर असले पाहिजे, क्षुल्लक मुद्द्यांवर वाद घालण्यावर नाही.”

08:04 (IST) 18 Mar 2025

Nagpur Violence Live Update : जिथे दंगल झाले त्या महाल परिसरातील सद्यस्थिती पाहा!

08:03 (IST) 18 Mar 2025

Nagpur Violence : नागपुरात संचारबंदी लागू, पोलिसांना प्रभावित रस्ते बंद करण्याचे आदेश; अधिसूचना जारी!

नागपुरात कबर हटवण्याच्या मागणीवरून सोमवारी रात्री (१७ मार्च) मोठा तणाव निर्माण झाला. दोन गटात झालेल्या दगडफेक आणि जाळपोळच्या घटनेमुळे नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत नागपूर शहरातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत अधिसूचनेतून समोर आली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सविस्तर वृत्त वाचा

23:46 (IST) 17 Mar 2025

नागपुरात दंगल नेमकी कशामुळे भडकली ? असा आहे घटनाक्रम

विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी दुपारी एक वाजता महाल झेंडा चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली. औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला.

सविस्तर वाचा….

23:43 (IST) 17 Mar 2025

Nagpur Violence: नागपूर हिंसाचारावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “जर कोणी दंगल केली किंवा पोलिसांवर…”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “नागपूरच्या महाल परिसरात ज्या पद्धतीने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे ती अत्यंत निषेधार्ह आहे. काही लोकांनी दगडफेक केली, अगदी पोलिसांवरही. हे चुकीचे आहे. मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.”

या घटनेवर व्हिडीओद्वारे प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेली कठोर पावले उचलण्याचे मी पोलिस आयुक्तांना सांगितले आहे. जर कोणी दंगल केली किंवा पोलिसांवर दगडफेक केली किंवा समाजात तणाव निर्माण केला तर अशा सर्व लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. नागपूरची शांतता बिघडू नये यासाठी मी सर्वांना आवाहन करतो. जर कोणी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”

23:41 (IST) 17 Mar 2025

Nagpur Violence: नागपूर हिंसाचारावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “जर कोणी दंगल केली किंवा पोलिसांवर…”

नागपूर हिंसाचारावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “नागपूरच्या महाल परिसरात ज्या पद्धतीने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे ती अत्यंत निषेधार्ह आहे. काही लोकांनी दगडफेक केली, अगदी पोलिसांवरही. हे चुकीचे आहे. मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.”

या घटनेवर व्हिडीओद्वारे प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेली कठोर पावले उचलण्याचे मी पोलिस आयुक्तांना सांगितले आहे. जर कोणी दंगल केली किंवा पोलिसांवर दगडफेक केली किंवा समाजात तणाव निर्माण केला तर अशा सर्व लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. नागपूरची शांतता बिघडू नये यासाठी मी सर्वांना आवाहन करतो. जर कोणी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”

23:00 (IST) 17 Mar 2025

Nagpur Live Updates: पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही: एकनाथ शिंदे

नागपूरमधील हिंसाचारात काही पोलिसही जखमी झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असे म्हटले आहे. याचबरोबर ही घटना जर नियोजीत असेल तर दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

22:54 (IST) 17 Mar 2025

Nagpur Violence: नागपूर हिंसाचार प्रकरणी सुमारे २५ जणांना अटक

नागपूर हिंसाचाराप्रकरणी पोलीस आयुक्त रविंदर सिंघल यांनी माहिती दिली असून, ते म्हणाले, “आम्ही या प्रकरणी गुन्हा केला असून, किमान २०-२५ जणांना अटक केली आहे.”

22:52 (IST) 17 Mar 2025

Nagpur Violence: “…तरीही पोलिसांना परिस्थितीची माहिती नाही”, आंबादस दानवे यांची टीका

नागपूर हिंसाचार प्रकरणी बोलताना, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, “नागपूरमधील परिस्थितीचे दंगलींमध्ये रूपांतर झाले आहे. ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नागपूरचे आहेत, तरीही पोलिसांना परिस्थितीची माहिती नाही असे दिसते.”

22:44 (IST) 17 Mar 2025

Nagpur Violence: ही आपल्या शहराची संस्कृती नाही: माजी गृहमंत्री अनिल देशमुख

नागपूर प्रकरणावर बोलताना महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, “नागपूरमधील दंगलीच्या घटनांमुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे. ही आपल्या शहराची संस्कृती नाही. अशा घटनांमुळे सामाजिक सौहार्द टिकवून ठेवणाऱ्या नागपूरच्या शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे सर्वांनी संयम बाळगणे आवश्यक आहे.”

22:40 (IST) 17 Mar 2025

Nagpur Violence: शांत शहराला सत्ताधाऱ्यांच्या समर्थक संघटनांनी गालबोट लावले: विजय वडेट्टीवार

नागपूर हिंसाचारावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, “नागपूर हे अतिशय शांत शहर असताना त्याला सत्ताधाऱ्यांच्या समर्थक संघटनांनी गालबोट लावले आहे. हे सगळ मंत्रिमंडळातील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांमुळे झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. जाणून बुजून दोन समाजात द्वेष पसरवणे, भांडण लावणे हे उद्योग केले जात आहेत आणि हे सत्ताधारी करत आहेत. नागपूरकरांनी शांतता बाळगावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी.”

22:37 (IST) 17 Mar 2025

Nagpur Violence: नागपूरमध्ये नियोजन करून सर्व हिंसाचार: आमदार प्रवीण दटकेंचा आरोप

नागपूर येथील हिंसाचाराबद्दल बोलताना भाजपाचे स्थानिक आमदार प्रवीण दटके म्हणाले, “…मला माहिती मिळाली आहे की बाहेरून काही लोकांनी दोन वेगवेगळ्या समुदायातील लोकांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वाहने जाळण्यात आली, दगडफेक करण्यात आली. एका विशिष्ट समुदायाचे लोक बाहेरून आले होते आणि त्यांनी योग्य नियोजन करून सर्व हिंसाचार केला. मुख्यमंत्री स्वतः परिस्थितीचा आढावा घेत आहेत. संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. यामध्ये काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.”

22:34 (IST) 17 Mar 2025

Nagpur Violence Updates: नागपूरमध्ये कलम १४४ लागू

Nagpur Violence: नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमधील वादानंतर तणाव निर्माण झाला असून, त्यानंतर महालमध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले आहे. यामध्ये हिंसाचारात सहभागी झालेल्यांची ओळख पटवून त्यांना अटक केली जात आहे. कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही कारणांशिवाय घराबाहेर न पडण्याचे निर्देश दिले आहेत.

22:29 (IST) 17 Mar 2025
Nagpur Stone Pelting Live Updates: “बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांना…”, नितीन गडकरी यांचे नागपूरकरांना शांततेचे आवाहन

केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांततेचे आवाहन करत, “काही अफवांमुळे नागपुरात धार्मिक तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहराचा इतिहास अशा बाबींमध्ये शांतता राखण्यासाठी ओळखला जातो. मी माझ्या सर्व बांधवांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखण्याचे आवाहन करतो. रस्त्यावर येऊ नका. कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थेला सहकार्य करा. मी तुम्हाला सर्वांना खात्री देतो की ज्यांनी बेकायदेशीर कृत्ये केली आहेत त्यांच्यावर सरकार कारवाई करेल. मुख्यमंत्र्यांना या परिस्थितीची आधीच माहिती देण्यात आली आहे, म्हणून मी सर्वांना विनंती करतो की अफवांकडे लक्ष देऊ नका.”