Nagpur Clashes Updates: नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांमधील वादानंतर हिंसक संघर्ष झाला, ज्यामुळे तोडफोड आणि जाळपोळ झाली. अनेक वाहने जाळण्यात आली असून, दगडफेकीच्या वृत्तांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Live Updates
22:52 (IST) 17 Mar 2025

Nagpur Violence: “…तरीही पोलिसांना परिस्थितीची माहिती नाही”, आंबादस दानवे यांची टीका

नागपूर हिंसाचार प्रकरणी बोलताना, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, “नागपूरमधील परिस्थितीचे दंगलींमध्ये रूपांतर झाले आहे. ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नागपूरचे आहेत, तरीही पोलिसांना परिस्थितीची माहिती नाही असे दिसते.”

22:44 (IST) 17 Mar 2025

Nagpur Violence: ही आपल्या शहराची संस्कृती नाही: माजी गृहमंत्री अनिल देशमुख

नागपूर प्रकरणावर बोलताना महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, “नागपूरमधील दंगलीच्या घटनांमुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे. ही आपल्या शहराची संस्कृती नाही. अशा घटनांमुळे सामाजिक सौहार्द टिकवून ठेवणाऱ्या नागपूरच्या शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे सर्वांनी संयम बाळगणे आवश्यक आहे.”

22:40 (IST) 17 Mar 2025

Nagpur Violence: शांत शहराला सत्ताधाऱ्यांच्या समर्थक संघटनांनी गालबोट लावले: विजय वडेट्टीवार

नागपूर हिंसाचारावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, “नागपूर हे अतिशय शांत शहर असताना त्याला सत्ताधाऱ्यांच्या समर्थक संघटनांनी गालबोट लावले आहे. हे सगळ मंत्रिमंडळातील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांमुळे झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. जाणून बुजून दोन समाजात द्वेष पसरवणे, भांडण लावणे हे उद्योग केले जात आहेत आणि हे सत्ताधारी करत आहेत. नागपूरकरांनी शांतता बाळगावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी.”

22:37 (IST) 17 Mar 2025

Nagpur Violence: नागपूरमध्ये नियोजन करून सर्व हिंसाचार: आमदार प्रवीण दटकेंचा आरोप

नागपूर येथील हिंसाचाराबद्दल बोलताना भाजपाचे स्थानिक आमदार प्रवीण दटके म्हणाले, “…मला माहिती मिळाली आहे की बाहेरून काही लोकांनी दोन वेगवेगळ्या समुदायातील लोकांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वाहने जाळण्यात आली, दगडफेक करण्यात आली. एका विशिष्ट समुदायाचे लोक बाहेरून आले होते आणि त्यांनी योग्य नियोजन करून सर्व हिंसाचार केला. मुख्यमंत्री स्वतः परिस्थितीचा आढावा घेत आहेत. संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. यामध्ये काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.”

22:34 (IST) 17 Mar 2025

Nagpur Violence Updates: नागपूरमध्ये कलम १४४ लागू

Nagpur Violence: नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमधील वादानंतर तणाव निर्माण झाला असून, त्यानंतर महालमध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले आहे. यामध्ये हिंसाचारात सहभागी झालेल्यांची ओळख पटवून त्यांना अटक केली जात आहे. कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही कारणांशिवाय घराबाहेर न पडण्याचे निर्देश दिले आहेत.

22:29 (IST) 17 Mar 2025
Nagpur Stone Pelting Live Updates: “बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांना…”, नितीन गडकरी यांचे नागपूरकरांना शांततेचे आवाहन

केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांततेचे आवाहन करत, “काही अफवांमुळे नागपुरात धार्मिक तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहराचा इतिहास अशा बाबींमध्ये शांतता राखण्यासाठी ओळखला जातो. मी माझ्या सर्व बांधवांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखण्याचे आवाहन करतो. रस्त्यावर येऊ नका. कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थेला सहकार्य करा. मी तुम्हाला सर्वांना खात्री देतो की ज्यांनी बेकायदेशीर कृत्ये केली आहेत त्यांच्यावर सरकार कारवाई करेल. मुख्यमंत्र्यांना या परिस्थितीची आधीच माहिती देण्यात आली आहे, म्हणून मी सर्वांना विनंती करतो की अफवांकडे लक्ष देऊ नका.”