कुलगुरू निवड प्रक्रियेला आवश्यक असणारी व्यवस्थापन परिषद (एमसी) आणि विद्वत परिषदेच्या (एसी) नामनियुक्त सदस्यांच्या नावांची पहिली यादी बाजूला सारून दुसरी यादी लवकरच गोंडवाना विद्यापीठाला पाठवण्यात येणार आहे.
विद्यापीठ स्थापन झाल्यापासून व्यवस्थापन परिषद आणि विद्वत परिषद गठीत झाले नसल्याने कुलगुरू निवड प्रक्रिया थंडावली होती.
यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची एक बैठक अधिवेशन काळात पार पडली. कुलगुरू निवड प्रक्रिया राबवण्यासाठी सर्च कमिटी स्थापन करावी लागते.
त्या कमिटीवर व्यवस्थापन परिषद आणि विद्वत परिषदेतून संयुक्तरित्या एक प्रतिनिधी नामनियुक्त करण्याबरोबरच एक कुलपती नामनियुक्त आणि एक शासन नामनियुक्त सदस्य सर्च कमिटीवर नेमायचा असतो. मात्र, गोंडवाना विद्यापीठ स्थापन झाल्यापासून तदर्थ अभ्यास मंडळांव्यतिरिक्त कोणतेच प्राधिकरण स्थापन करण्यात आले नाही किंवा त्यासाठी निवडणुकाही झाल्या नाहीत. त्यामुळेच कुलगुरू निवड प्रक्रिया खोळंबली असून नवीन सरकारने ही निवड प्रक्रिया गतिमान केली आहे. नवीन सरकारने आधीची २०१२ची यादी बाजूला सारली असून व्यवस्थापन परिषद आणि विद्वत परिषदेच्या नामनियुक्त सदस्यांची दुसरी यादी तयार करून ती लवकरच विद्यापीठाला पाठवली जाणार असल्याचे कळते.
विद्यापीठ स्थापन झाल्यापासून पहिली व्यवस्थापन परिषद आणि विद्वत परिषद स्थापन करण्याचे अधिकार शासनाला आहेत. त्यानुसार लवकरच व्यवस्थापन परिषद व विद्वत परिषद स्थापन करण्यात येणार असून त्यावरील नामनियुक्त सदस्यांची यादी शासनाकडून विद्यापीठाला पाठवली जाईल.
कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी ही दोन्ही प्राधिकरणे गठित होणे आवश्यक असून या प्रक्रियेसाठी आवश्यक सर्च कमिटी अद्याप स्थापन व्हायची आहे. यासंदर्भात मंत्री विनोद तावडे यांच्याशी अधिवेशन काळात चर्चा झाली असून सर्च कमिटी स्थापन करण्यासाठी लवकरच एमसी आणि एसीच्या सदस्यांच्या नावांची यादी पाठवली जाईल, असे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.