परवानगी न घेताच वाघाला पुण्याला पाठविण्याचा घाट घालणाऱ्या वनखात्याच्या निर्णयावर काही दिवसांसाठी का होईना गणेशोत्सवामुळे पाणी फेरले गेले. त्यामुळे सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पात मुक्कामास असलेल्या या वाघाने गणरायाचे आभार मानले आहेत. तरीही वाघावरचे संकट काही टळले नसून पुण्यातील कात्रज संग्रहालयाच्या चमूने त्यांचे वाहन आणि पिंजरा मात्र वाघ कधीतरी पिंजऱ्यात येईल, या अपेक्षेने पेंच व्याघ्र प्रकल्पातच ठेवला आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील मोठय़ा पिंजऱ्यांमध्ये दोन वाघिणी आणि एका वाघाचा मुक्काम आहे. त्यातील दोन वाघिणींना जंगलात सोडण्याचा तर वाघाला पुण्यातील कात्रज प्राणीसंग्रहालयात पाठविण्याच्या निर्णयावर प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) सर्जन भगत यांनी शिक्कामोर्तब केले. त्यांच्या या निर्णयावर अनेक वन्यजीवप्रेमी व तज्ज्ञांनी आक्षेप घेतला. या वाघाला पुण्याच्या प्राणीसंग्रहालयात पाठविण्याऐवजी नागपुरातीलच महाराजबाग प्राणीसंग्रहालयात ठेवण्याची मागणी प्राणीसंग्रहालय प्रशासनाने केली. भविष्यात या ठिकाणी वाघांचे प्रजनन केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने ही मागणी होती. मात्र, ही मागणी धुडकावून लावत सर्जन भगत यांनी हा वाघ पुण्याला पाठविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्यावर खुद्द मानद वन्यजीव रक्षकाने सर्जन भगत यांना पत्र लिहून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्याही पत्राला त्यांनी उत्तर दिले नाही आणि गणेशोत्सवाच्या काही दिवसांआधी या वाघाच्या स्थलांतरणाची तयारी सुरू झाली. त्यासाठी पुण्याहून चमुही दाखल झाली, पण वाघाच्या मर्जीविरुद्धचा हा निर्णय असल्याने त्यानेही पिंजऱ्यात जाण्यास नकार दिला. गाय, बकरी, हरीण अशा त्याच्या आवडत्या सावजांचे आमीष दाखवण्यात आले तरीही वाघाने दाद दिली नाही. अखेर त्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात घालण्याचा घाट वनविभागाने घातला, पण गणेशेात्सवाने त्यावरही पाणी फेरले. पुण्या-मुंबईकडील गणेशोत्सवाची धूम वाघाला नेण्यासाठी आलेल्या चमूला परत बोलावण्यास कारणीभूत ठरली. गणेशोत्सवानिमित्त ही चमू पुण्याला गेल्यामुळे सध्या तरी या वाघावरचे पुण्याला जाण्याचे संकट टळले आहे. मात्र, गणेश विसर्जन झाल्यानंतर पुन्हा ही चमू पेंचमध्ये दाखल होणार असल्याचे कळले. त्यामुळे पेंचमधला हा वाघ त्यांना आता तरी प्रतिसाद देतो का, हे नंतरच कळेल. दरम्यान, या वाघांचे स्थलांतरण रोखण्यासाठी स्थानिक आमदारांनीसुद्धा प्रयत्न केले. आमदार आशिष जयस्वाल आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) सर्जन भगत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे वाघ पुण्याला जाण्यास तयार होतो की पेंचमध्येच राहतो, हे येत्या काही दिवसातच कळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा