नागपूर : वडसाकडे जाणाऱ्या भरधाव खासगी बसने उभ्या ट्रक ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच प्रवासी ठार झाले असून दहा जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचाराक रिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल करण्यात आले. रात्री साडेआठनंतर ही घटना घडली. कीर्ती सुरेशसिंग चौरे (३२, रा. कोल्हारी), रामदास सीताराम मडावी (५५, रा. सिंदेवाही) व अजय रामटेके
(रा. भुयार) हे अपघातात ठार झाले असून दोघांचे नाव कळू शकले नाही.
नागपूरहून व वडसाला मोठय़ा प्रमाणात खासगी बसेस चालतात. राहुल ट्राव्हल्स कंपनीची एमएच-३४, ए-८४७५ क्रमांकाची एक बस प्रवाशांना घेऊन वडसाच्या दिशेने जात होती. दरम्यान, उमरेडच्या परिसरातील उदासा या गावाजवळ रस्त्याच्या कडेला गिट्टीने भरलेले एमएच-४०, एके-२३४४ क्रमांकाचा टिप्पर उभा होता. बस भरधाव होती व चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने टिप्परला धडक दिली.
यात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दहाजण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी टिप्पर जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘रास्ता रोको’ केल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
माहिती मिळताच उमरेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत परिसरात तणावाचे वातावरण होते.