पंजाबातील घुमान येथे होणारे ८८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनास महिन्याभरापेक्षाही कमी कालावधी राहिलेला असताना प्रकाशकांच्या संमेलनावरील बहिष्काराचे नाटय़ संपलेले नाही. एकीकडे याबाबतचा वाद संपुष्टात आल्याचे सांगण्यात येत असले तरी नागपुरातील प्रकाशक संमेलनाकरिता जाण्यास अजूनही राजी झालेले नाहीत. प्रकाशकांनी घुमान येथे हजेरी लावावी, यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, नागपुरातील प्रकाशकांचा बहिष्कार संपुष्टात आणण्यात कुणालाच यश आलेले नाही.
संत नामदेवांच्या वास्तव्याची पाश्र्वभूमी असलेल्या घुमान येथे ३ ते ५ एप्रिलदरम्यान हे साहित्य संमेलन होत आहे. मात्र, घुमानसारख्या लहान व अमराठी वातावरण असलेल्या ठिकाणी संमेलन घेण्याच्या मुद्यावरून राज्यातील प्रकाशक व आयोजकांचे बिनसले आणि प्रकाशकांनी संमेलनावर बहिषकर घातला. मध्यंतरी हा वाद संपला असल्याचे व प्रकाशक राजी झाल्याचेही निरनिराळ्या माध्यमातून सांगण्यात आले. किंबहुना, असा काही वादच नसल्याचे व माध्यमांनीच हा वाद निर्माण केल्याचेही विविध धुरिणांनी सांगितले, परंतु अशा अनेक दाव्यानंतरही प्रकाशकांचा या संमेलनावरील बहिष्कार संपविण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला यश आलेले नाही.
संमेलन जवळ येऊन ठेपलेले असताना नागपुरातील प्रकाशक बहिष्कारावर ठाम आहेत व बहुतांश प्रकाशकांनी घुमानला न जाण्याचाच निर्णय घेतला आहे. नेमके किती प्रकाशक संमेलनाला जाणार आहेत. यावर विदर्भ साहित्य संघ काहीही बोलण्यास तयार नाही, तर साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित मान्यवरही ‘हाताची घडी अन् तोंडावर बोट’ याच भूमिकेत आहेत. या संमेलनातील विविध सत्रात वक्ते म्हणून सहा जण विदर्भातून सहभागी होत आहेत, तर सहा कवी संमेलनाच्या व्यासपीठावरून आपले काव्य सादर करणार आहेत. याशिवाय, १६० जणांनी वि.सा.संघाकडे नोंदणी केली आहे व घुमानवारीची तयारीही चालवली आहे. मात्र, अशी निश्चिती अजून प्रकाशकांच्या बाबतीत मात्र झालेली नाही. ‘नागपुरातून प्रकाशक घुमानला जाणार नाहीत, ही भूमिका कायम आहे. साहित्य विक्री आणि नफा हा भाग जरी सोडला तरी किमान १० ते २० हजार वाचकांनी प्रकाशकांच्या स्टॉल्सना भेट द्यावी, ही अपेक्षा गैर म्हणता येणार नाही. घुमानसारख्या लहान ठिकाणी इतक्या संख्येने वाचक येणे शक्य नाही. मग तेथे जाण्यात अर्थ काय,’ असा सवाल विजय प्रकाशनचे सचिन उपाध्याय यांनी केला. लाखे प्रकाशनचे चंद्रकांत लाखे यांनीही याला दुजोरा दिला आहे. नागपुरात प्रकाशकांची संघटना नाही. मात्र, तरीही नागपुरातून प्रकाशक घुमानला जाणार नाहीत. महामंडळाकडून नागपुरातील प्रकाशकांशी कोणताही संपर्क झालेला नाही आणि वि. सा.संघाकडूनही याबाबत प्रकाशकांकडे पाठपुरावा झाला नसल्याचे लाखे यांनी सांगितले. वैयक्तिकरीत्या काही प्रकाशक संमेलनाला जाणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी नागपुरातील प्रकाशकांनी एकत्रित निर्णय केलेला नाही. संमेलनाला अजून उणापुरा एक महिना उरला असल्याने प्रकाशकांच्या निर्णयात बदल होऊ शकतो, अशी आशाही साहित्य क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

Story img Loader