Devendra Fadnavis Reaction On Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे नागपूरमध्ये हिंसाचार झाला आहे. दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या महाल परिसरात दोन गटातील लोक समोरासमोर आले. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर जाळपोळही करण्यात आली. यामध्ये अनेक वाहनांची तोडफोडही करण्यात आली. त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करून गर्दी पांगवावी लागली. सध्या परिसरात तणाव असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे

यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “नागपूरच्या महाल परिसरात ज्या पद्धतीने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे ती अत्यंत निषेधार्ह आहे. काही लोकांनी दगडफेक केली, अगदी पोलिसांवरही. हे चुकीचे आहे. मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.”

या घटनेवर व्हिडीओद्वारे प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेली कठोर पावले उचलण्याचे मी पोलिस आयुक्तांना सांगितले आहे. जर कोणी दंगल केली किंवा पोलिसांवर दगडफेक केली किंवा समाजात तणाव निर्माण केला तर अशा सर्व लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. नागपूरची शांतता बिघडू नये यासाठी मी सर्वांना आवाहन करतो. जर कोणी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”

पोलीस कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाचा जवान जखमी

नागपूरचे डीसीपी अर्चित चांडक यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ही घटना काही अफवांमुळे घडली आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आमचे पथक येथे उपस्थिती असून, मी सर्वांना आवाहन करतो की कोणीही कारणाशिवाय घराबाहेर पडू नका. किंवा दगडफेक करू नका. दगडफेक सुरू होती, म्हणून आम्ही बळाचा आणि अश्रूधुराचा वापर केला.”

अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “२ जेसीबी आणि २-३ इतर वाहने पेटवण्यात आली आहेत. यात आमचा एक अग्निशमन कर्मचारी जखमी झाला आहे.”

पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही: एकनाथ शिंदे

नागपूरमधील हिंसाचारात काही पोलिसही जखमी झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असे म्हटले आहे. याचबरोबर ही घटना जर नियोजीत असेल तर दुर्दैवी असल्याचेही म्हटले.