Nagpur Violence Updates: नागपूरच्या महालमधील झेंडा चौकात दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर काल मोठी जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड झाली होती. यावेळी जमावाल पांगवताना एका गटातील लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. दरम्यान या घटनेत काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

दरम्यान आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिंसाचारा प्रकरणी निवेदन देले आहे. ते म्हणाले, “काल १७ मार्च रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाजी कबर हटवावी असे नारे दिले. यावेळी त्यांनी औरंगजेबाजी प्रतिकात्मक कबर जाळली. यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर विविध कलमांतर्गत दुपारी गुन्हे दाखल केले.”

जमावाकडून हिंसक घोषणा

फडणवीस पुढे म्हणाले, “यानंतर सायंकाळी, सकाळी जाळलेल्या प्रतिकात्मक कबरीवरील कापडावर धार्मिक मजकूर होता अशी अफवा परवण्यात आली. त्यानंतर अत्तरओळमधील नमाज आटोपून २०० ते २५० लोकांच्या जमावाने घोषणाबाजी सुरू केली. याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे केल्याने पोलिसांनी त्याठिकाणी बळाचा वापर केला.”

वाहनांची जाळपोळ

“यानंतर पोलिसांनी एकीकडे सकाळी घडलेल्या घटनेविरोधात कारावाई करण्यासाठी तक्रारदारांना बोलवले होते. तर, दुसरीकडे हंसापुरी भागात २००-३०० लोकांनी दगडफेक केली. यामध्ये काहींवर शस्त्रांनी हल्ला करण्यात आला तर अनेक वाहने जाळण्यात आली”, असेही फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितले.

पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला

फडणवीस पुढे म्हणाले, “हिंसाचाराची तिसरी घटना सायंकाळी साडेसात वाजता भालदारपुरा भागात झाली. ८० ते १०० लोकांचा जमाव तिथे होता. त्यांनी तिथे पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी अश्रूधूर व सौम्यबळाचा वापर केला. या घटनेत एक क्रेन दोन जेसीबी व काही वाहने जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेमध्ये ३३ पोलीस जमखी झाले आहेत. यात उपायुक्त दर्जाच्या तीन पोलिसांचा समावेश आहे. यातील एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे.”

नागपूरकरांना शांततेचे आवाहन

नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालही व्हिडीओद्वारे प्रतिक्रिया दिले होती. ते म्हणाले होते, “कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेली कठोर पावले उचलण्याचे मी पोलिस आयुक्तांना सांगितले आहे. जर कोणी दंगल केली किंवा पोलिसांवर दगडफेक केली किंवा समाजात तणाव निर्माण केला तर अशा सर्व लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. नागपूरची शांतता बिघडू नये यासाठी मी सर्वांना आवाहन करतो. जर कोणी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”

Live Updates

Story img Loader