Nagpur Breaking News Update Today : नागपूरमध्ये झालेल्या भीषण दंगलीत अनेक पोलीस आणि नागरीक गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर झोन ५ चे उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. यामुळे त्यांना खोलवर जखम झाली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान,हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत त्यांनी आता सविस्तर माहिती दिली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

निकेतन कदम म्हणाले, “नागपूरचे सीपी सर यांच्या नेतृत्त्वात आणि एसआरपीएफ जवनांच्या मदतीने नागपूरची परिस्थिती हाताळली गेली. दंगल झाली त्या विभागात खूप अरुंद गल्ल्या आहेत. त्या प्रत्येक रस्त्यांवर दगडफेक सुरू होती. त्यांच्याकडे शस्त्र, काठ्या, पेट्रोलच्या बॉटल्स होत्या. त्यामुळे आम्ही पुढे जाऊन त्यांना मागे करण्याचा प्रयत्न करत होतो. एका संशयित हल्लेखोराला शोधण्यासाठी एक टीम एका घरात गेली. तेवढ्यात शेकडोने माणसं जमा झाली. ती टीम घरात होती, तर मी बाहेर होतो. (या जमावाने पोलिसांना घेरलं होतं.) करायचं काय? जमावाने घरावर हल्ला केला असता तर मोठी अप्रिय घटना घडली असती.”

ते पुढे म्हणाले, “माझ्याकडे काठी आणि हेल्मेट होतं, त्या बेसिसवर मी जमावाला मागे करण्याचा प्रयत्न केला. त्यातील काहीजण मागे सरकलेही. पण एकाकडे कुऱ्हाड होती, त्याने अगदी जाणीवपूर्क माझ्यावर वार केला. हा वार मी अडवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे माझ्या हाताला खोलवर जखम झाली.”

नागपुरात सद्यस्थिती काय?

शहरातील कोतवाली तहसील, लकडगंज, नंदनवन, सदर, महाल यासह अन्य परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात आहे. या परिसराकडे येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू असून संशयित व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. महाल , इतवारी लकडगंज, कोतवाली या परिसरातील बाजारपेठा कडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकॅडिंग केली आहे. गांधी गेट, महाल चिटणीस पार्क चौक यासह अन्य भागात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सशस्त्र जवानाना तैनात केले आहे. सोमवारी उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण शहरभर दिसत असून सध्या शहरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे.

सुनसान रस्ते आणि पोलिसांची गर्दी

अशोक चौकापासून ते इतवारीपर्यंत तसेच महालपासून तर शुक्रवारी तलावापर्यंतचा रस्ता सूनसान होता. रस्त्यावर एकही वाहन दिसत नव्हते. या भागातील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांची गर्दी दिसत आहे. त्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी पोलिसांनी १५० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करून अटक केली आहे.

Story img Loader