DCM Eknath Shinde Reaction on Nagpur Violence : नागपुरात घडलेल्या हिंसाचारामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासाठी झालेल्या आंदोलनाला वेगळं वळण लागलं अन् १७ मार्च रोजी रात्री नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून पोलीस आणि इतर काही नागरिक जखमी झाले आहे. दरम्यान, ही घटना पूर्वनियोजित होती, असा संशय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, नागपुरातील दंगल पूर्वनियोजित कट होता, असं वाटतंय. या भागात दररोज १००-१५० दुचाकी पार्क होत होत्या. मात्र तिथे काल एकही गाडी पार्क नव्हती. इतर दुचाकी आणि चारचाकी जाळून टाकल्या गेल्या. मोठ्या प्रमाणात दगडफेक केली, हॉस्पिटलला लक्ष्य केलं. पाच वर्षीय मुलगी बालंबाल बचावली. त्या रुग्णालयातील देवदेवतांचे फोटो जाळले. फायर ब्रिगेडची गाडी जाळली, पोलिसांवर हल्ला केला.”
जाणीवपूर्वक दंगल घडवून द्वेष पसरवण्याचं काम
“समाजकंटकांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. हल्ला करून त्यांना जखमी करणं अत्यंत दुर्दैवी बाब आहे. समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. नागपूर हा शांतताप्रिय जिल्हा आहे. त्यामध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवून द्वेष पसरवण्याचं काम केलं जातंय”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला कलंक
“औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. हा कलंक पुसण्यासाठी अनेक लोक आंदोलन करत आहेत. हे चुकीचं नाही. ब्रिटिशांनी आपल्यावर आक्रमण केलं, त्यांच्याही खाणाखुणा आपण पुसून टाकल्या. आक्रमणकाऱ्यांच्या खाणाखुणा आपण पुसून टाकते. या औरंगजेबाने तर जुलमी राज्यकारभार केला. अशा औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं, समर्थन करणं, हे महाराष्ट्र सहन करणार नाही, माफ करणार नाही”, असंही त्यांनी पुढे म्हटलं.
“अबू आझमींनी याची सुरुवात केली. त्यांना विशिष्ट समाजाची, विशिष्ट मतांची जुळवणी करायची आहे. विशिष्ट मतं घेत असताना समाजात तेढ होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे त्यांना निलंबित केलं. जे जे लोक औरंग्याच्या समर्थनासाठी बाहेर येतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल”, असंही ते म्हणाले.