अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीची घोषणा करावी, या मागणीसाठी विरोधकांनी गदारोळ केल्याने विधान परिषदेचे कामकाज मंगळवारी दिवसभरासाठी सभापतींना तहकूब करावे लागले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी अकरा वाजता विधान परिषदेचे कामकाज सुरू झाले. प्रश्नोत्तरे. तसेच इतर कामकाज झाल्यानंतर सभापतींच्या अनुमतीने महाराष्ट्र विधान परिषद नियम २८९ अन्वये सूचना विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मांडली. जून व जुलै महिन्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्याने विदर्भ व कोकणातील शेतकरी अडचणीत आला आहे. विहिरींसह रस्ते, पाटबंधारे प्रकल्प, रोहित्रे आदी सार्वजनिक मालमत्तेचे हजारो कोटींचे नुकसान झाले. तातडीने सर्वेक्षण करणे गरजेचे असले तरी उशिरा सर्वेक्षण झाले. अनेक भागात केवळ नदीच्या ठिकाणीच पंचनामा करण्यात आला. तातडीने मदतीची मागणी जुलै महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात करण्यात आली. अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी व नंतर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तेव्हा केली होती.
पुन्हा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली. किमान २५ हजार रुपये हेक्टरी मदतीची गरज असूनही केवळ पाच हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली. अद्यापही मदत मिळालेली नाही. काही शेतकऱ्यांना केवळ दोनशे वगैरे रुपयांचे धनादेश देण्यात आले. ही शेतकऱ्यांची थट्टा असून या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता सर्व कामकाज बाजूला ठेवून आधी किमान ६ हजार ४५९ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर करावे आणि चर्चा करावी, अशी मागणी विनोद तावडे यांनी सभापतींना केली. दिवाकर रावते, पांडुरंग फुंडकर, रामदास कदम, जयंत पाटील, डॉ. दीपक सावंत, शोभा फडणवीस, सुमंत गायकवाड, चंद्रकांत पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. रणजित पाटील, रामनाथ मोते, अ‍ॅड. आशिष शेलार, भाई गिरकर, नागो गाणार, भगवान साळुंके आदींच्या स्वाक्षरींचे निवेदन याआधीच विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना सादर करण्यात आले आहे. जयंत पाटील, पांडुरंग फुंडकर, डॉ. दीपक सावंत यांनी उभे राहून विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीस सहमती दर्शविली.
सभागृहाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहिले. अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, या मताचे शासन आहेच. या विषयावर चर्चा जरूर व्हावी. मात्र, इतरही कामकाज व्हावे. कितीही वेळ चर्चेसाठी बसण्यास त्यांनी तयारीही दर्शविली. जुलैमधील अधिवेशनात चर्चा झाली. आता आधी किमान ८१० कोटी रुपये मदत जाहीर करा व मगच चर्चा करा, असा आग्रह तावडे यांनी धरला. साडेचारशे कोटी रुपयांची मदत दिली असून त्याचे वाटप सुरू आहे.
आणखी २२२ कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर केली आहे, असे पवार यांनी म्हणताच तावडे यांच्यासह विरोधी बाकावरील सदस्य उभे झाले.
शेतकऱ्यांचे खरोखरीच नुकसान झाले असून या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झालीच पाहिजे. मात्र, इतरही महत्त्वाचे विषय आहे, असे मत सभापतींना व्यक्त केले.

राणे यांच्या वक्तव्याने संताप
यावेळी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सभापतींची परवानगी घेत बोलणे सुरू केले. विरोधकांना सभागृह चालवायचे नाही, चर्चेआधी पैसे कसे मागतात, असे ते म्हणाले. त्यामुळे संतप्त झालेले विरोधी बाकावरील सदस्य आक्रमक झाले. सभापतींच्या आसनासमोर गोळा होत त्यांनी घोषणा देणे सुरू केले. ‘आश्वासन नको पैसे द्या’ या घोषणांच्या गदारोळात सभापतींनी कामकाज वीस मिनिटे तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पुन्हा घोषणा देणे सुरू केले. अवघ्या काही मिनिटात सभापतींनी सदनाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केल्याची घोषणा केली.

Story img Loader