महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका असलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘ झुंड ‘ चित्रपट सोलापुरात चित्रपटगृहात धुमधडाक्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे सार्वत्रिक कौतुक होत असताना सोलापुरात ज्या चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्या चित्रपटगृहाबाहेर अमिताभ बच्चन यांच्यासह नागराज मंजुळे यांचे हाताने रेखाटलेले भले मोठे पोस्टर उभारण्यात आले आहे.
मेकानिक चौकातील पूर्वाश्रमीच्या मीना आणि सध्याच्या ई-स्केअर चित्रपटगृहात ‘ झुंड ‘ प्रदर्शित झाला आहे. नागराज मंजुळे हे मूळचे याच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील राहणारे. सोलापुरात यापूर्वी नागराज मंजुळे ज्या चित्रपटगृहाबाहेर चित्रपटाचे पोस्टर पाहण्यासाठी फिरायचे, आता त्या चित्रपटगृहाबाहेर त्यांचे स्वतःचे उंच, भव्य आणि दिमाखदार पोस्टर उभारण्यात आले आहे. दिवंगत प्रख्यात चित्रकार यल्ला-दासी यांच्या कलेचा वारसा घेतलेले त्यांचे पुत्र श्रीनिवास यल्ला आणि नागनाथ दासी या जोडीने मंजुळे व अमिताभ बच्चन यांचे कटआउट हाताने साकारले आहे.
दिवंगत यल्ला-दासी म्हणजे विश्वनाथ यल्ला आणि सिद्राम दासी ही चित्रकारांची जोडी चित्रपटसृष्टीच्या ५० वर्षापूर्वीच्या वैभवाच्या काळात चित्रपट पोस्टर साकारण्यासाठी देशभरात प्रसिद्ध झाली होती. मुघल ए आझम, गंगा जमुना, संगम ते शान, शालिमारपर्यंत असंख्य चित्रपटांचे साकारलेले भव्य पोस्टर यल्ला- दासी यांनी साकारले होते. अलिकडे डिजिटल जमान्यात हाताने चित्र रेखाटण्याचे दिवस मागे पडले आणि डिजिटल छपाईचे युग अवतरले. परंतु तरीही यल्ला-दासी यांच्या दोन्ही मुलांनी आपल्या कलेचा वारसा जपत झुंड चित्रपटासाठी अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांचे उंच कटआउट पोस्टर प्रत्यक्ष हातांनी रेखाटले आहे. हे पोस्टर चित्रपटगृहाबाहेर पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी उसळली होती. यानिमित्ताने ४०-५० वर्षांच्या गाजलेल्या अनेक चित्रपटांच्या पोस्टरच्या आठवणींनाही उजाळा दिला जात आहे.