कराड तालुक्यातील वसंतगडचे सुपुत्र नायब सुभेदार शंकर बसाप्पा उकलीकर हे सैन्य दलातील इंजिनीयर रेजीमेंटमधून देश रक्षणाचे कर्तव्य बजावताना लेहच्या बर्फाळ प्रदेशात हुतात्मा झाले. ते ३८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, आर्या ही सहा वर्षाची मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
हेही वाचा >>> “पंतप्रधान मोदींना आताच हिमालयात पाठवा, देशाचं भलं होईल”, RSSचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका
कारगीलमधील लेहच्या बर्फाळ प्रदेशात सोमवारी (दि.९) झालेल्या दुर्घटनेत शंकर उकलीकर हुतात्मा झाल्याची दुःखद वार्ता समजताच वसंतगड परिसरावर शोककळा पसरली. बर्फाच्छादीत शिखर सर करण्याचे प्रशिक्षण सन २००८ मध्ये यशस्वीपणे पूर्ण केलेले सुभेदार शंकर उकलीकर लेहमध्ये रुजु होते. त्यांचे पार्थिव विमानाने पुण्यात व तिथून वसंतगड येथे उद्या गुरुवारी येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> यंदाचा साखर हंगाम कधी सुरू होणार? मंत्री समिती बैठकीला मुहूर्त मिळेना
घरची बेताची परिस्थिती असताना मोठ्या जिद्दीने व कष्टाने वसंतगड व कराडच्या सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयात शिक्षण घेवून ते सन २००१ मध्ये भारतीय सैन्य दलातून देश संरक्षणाच्या पवित्र कार्यात रुजू झाले. त्यांनी २२ वर्षे राष्ट्र रक्षणाचे कर्तव्य बजावले. सध्या ते मथुरा मिल्ट्री स्टेशनमधील बॉम्बे इंजिनीयरिंग ग्रुपमधील ११२ इंजिनीयर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. दिल्लीतील सैन्य दलाच्या मुख्यालयातून ४० जवानांना लेहमध्ये पाचारण करण्यात आले. इथल्या बर्फाळ प्रदेशात अचानक दुर्घटना घडून नऊ सैनिक गाढले गेले. त्यातील तिघांचे पार्थिव मिळून आले. त्यात शंकर उकलीकर यांचा समावेश आहे. ते सहा महिन्यापूर्वी गावी येवून गेले होते. सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान होते. दरवर्षी गणेशोत्सवात वसंतगडला ते येत असत. पण, यंदा ते शक्य झाले नाही.