नाका मजुरांची आर्थिक कोंडी; ग्रामीण भागात ‘मनरेगा’च्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी
नितीन बोंबाडे
करोना काळात बांधकाम व्यवसाय, बाजाराला मंदी आल्याने मोलमजुरी करून हातावर पोट सांभाळणाऱ्या नाका मजुरांना कामाची मागणी नसल्याने पालघर जिल्हय़ातील १२०० हून अधिक नाका मजुरांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवाय तालुक्यात शासनाच्या विविध विभागामार्फत होत असलेली रोजगार हमी योजना देखील प्रभावीपणे सुरू नसल्याने गेल्या अनेक महिन्यापासून आदिवासी बांधव बेरोजगार होऊन घरी बसलेले आहेत. हाताला काम नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागात मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.
पालघर जिल्ह्यतील तलासरी, डहाणू, पालघर, जव्हार तालुक्यात ग्रामीण भागात बाजाराच्या नाक्यावर बेरोजगार तरुण कामाच्या शोधात जमा होतात. नाक्यावर आल्यानंतर मालवाहू वाहनांवर हमालीची कामे, बांधकाम व्यवसायात बिगारी, हेल्पर, रेती, खडम्ी, मुरुम- मातीच्या ट्रकवर हमाली आदी कामे करून हजारो तरुण आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. मात्र करोनामुळे बाजारपेठेला मंदी आल्याने त्यावर अवलंबून असणारी अनेक कामे ठप्प झाली आहेत. नाका मजूर म्हणून काम करणाऱ्या हजारो बेरोजगार तरुणांना हाताला काम नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यात शासनाचा विविध विभागामार्फत होत असलेली रोजगार हमी योजना देखील प्रभावीपणे सुरू नसल्याने लोकांना घरी बसावे लागत आहे. त्यामुळे मजूर वर्गापुढे उदरनिर्वाहाचा मोठ प्रश्न निर्माण झाला आहे.
पालघर, सफाळे, बोईसर, डहाणू, वाणगाव रेल्वे स्टेशन, चारोटी, कासा, मनोर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा बस स्थानकातून बांधकाम व्यवसाय तसेच इतर श्रमाची कामे, बिगारी कामे, प्लंबिंग, रंगारी, नालेसफाई, लाकूड कटाईची कामे, साफसफाई, वाडीतली कामे, गवत कापणी, भात कापणी, गवताची गंजी लावणे, विटा वाहणे, वीट भट्टी लावणे, रेती काढणे, रेती वाहणे, मासेमारी, फर्निचर बनविणे, अशा विविध कामासाठी शहारातून गजारो मजुरांचा पुरवठा होतो. शहरात बिगारी कामासाठी चांगला मोबदला मिळतो.
अनेक महिन्यांपासून घरीच
पालघर, सफाळा, बोईसर, केळवे येथील अनेक बेरोजगार तरुण वसई, विरार, भाईंदर तसेच बोरिवली परिसरात नाका मजूर म्हणून दररोज काम शोधतात. परंतु करोनामुळे सामान्य नागरिकास रेल्वे सेवा बंद असल्याने शहरात जाता येत नसल्याने अनेक महिन्यांपासून घरीच बसावे लागले आहे, तर गावात काम नसल्याने तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.
डहाणूमध्ये एमआयडीसी नाही. त्यामुळे लोकांना कायमस्वरूपी काम मिळत नाही. काम मिळवण्यासाठी नाक्यावर जाऊन उभे राहावे लागते. परंतु कामासाठी कोणच बोलावत नसल्याने घरी बसून आहोत.
– रघू पटारा, मजूर
मनरेगामधून सर्वच ग्रामपंचयातींमधून गावोगावी कामे काढून रोजगार उपलब्ध केला जात आहे.
– एच. भरक्षे, गट विकास अधिकारी, डहाणू पंचायत समिती