घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी शहरातील तरुणाईलाही सोबत घेण्याचे आदेश
दंडकारण्यात नक्षल चळवळीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रसार माध्यमांचा योग्य पध्दतीने उपयोग करून घेण्याचे निर्देश वरिष्ठ नक्षली नेत्यांनी दिले आहेत. तसेच ग्राम संघ सदस्यांनी घरोघरी जाऊन नक्षल चळवळीचा गुप्त प्रचार करण्यासाठी अतिदुर्गम भागातील आदिवासींसोबतच शहरी भागात महाविद्यालयीन तरुणाईला सोबत घेण्यास सांगण्यात आले आहेत.
दंडकारण्यात नक्षल चळवळ मजबूत करण्यासाठी वरिष्ठ नक्षली नेत्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचबरोबर प्रसार माध्यमांमध्ये चळवळीचे सकारात्मक वृत्त यावे, यासाठी नक्षलवादी प्रयत्नरत आहेत, तसेच पोलिस दलाची विविध माहिती प्रसार माध्यमातून मिळावी, यासाठी नियमित वृत्तपत्राचा उपयोग केला जात आहे.
वरिष्ठ नक्षली नेत्यांनीही दंडकारण्यात नक्षल चळवळीचा विस्तार व्हावा व शहरातही चळवळीकडे तरुण आकर्षित व्हावे म्हणून माध्यमांचा योग्य पध्दतीने उपयोग करण्याचे निर्देश दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्य़ात अतिदुर्गम भागात नक्षलवादी चळवळीतील अनेक सकारात्मक माहिती माध्यमांव्दारेच पोहचवित आहेत. इतकेच नव्हे, तर इतर सर्व माध्यमांचाही उपयोग करण्याच्या सूचना आहेत.
व्यंकटापूर चकमकीदरम्यान सापडलेल्या साहित्यातून ही माहिती समोर आली आहे. प्रचारासाठी ग्राम संघाव्दारे जेव्हाच्या तेव्हा पोस्टर व्हाईस टाकावे, भिंतीवर चळवळीच्या प्रचाराच्या म्हणी लिहाव्या, ग्राम संघ सदस्यांना घरोघरी जाऊन गुप्त प्रचार करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, पार्टी कार्यक्रम लोकांमध्ये जेव्हाच्या तेव्हा नेण्यासाठी एरिया व्याप्त कॅम्पेन दलांची निर्मिती करून त्याव्दारे प्रचार करावा, स्कॉड एरिया समिती त्याच्या हद्दीतील एरियात आवश्यक पत्रिका व जाहिराती एरिया लोकसंघाव्दारे द्यावी, स्कॉड एरिया समितीने त्याच्या हद्दीतील स्थानिक समस्यांवर जाहीर पत्रके टाकावी, त्याच्या छपाईसाठी सायक्लोस्टाईल किंवा संधी असल्यास छपाईतंत्र उपलब्ध असल्यास त्याचा वापर करण्याचेही निर्देश दिले आहेत.
जनता व संघ वाचू शकेल, अशा प्रकारे क्रांती साहित्य बोलावून एका पध्दतीनुसार सतर्कता बाळगून प्रचार करावा, नक्षल चळवळीची गाणी व कथांचा प्रचार करण्यासाठी प्रामुख्याने ध्वनिफितींचा वापर करावा, त्या लोकांमध्ये वितरित करण्याचेही निर्देश दिले आहेत.
ग्रामीण व शहरी भागात विविध वर्गातील लोकांनी तोंड देतांना समस्यांवर व इतर सर्व प्रकाराच्या संघर्षांना पाठिंब्यासाठी शक्य झालेल्या प्रसार माध्यमांचा वेळोवेळी उपयोग करून घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नक्षलवादी प्रचारसाठी मोठय़ा प्रमाणात लाल रंगाचे कापडी फलक, पोस्टर्स, बॅनर्स, तसेच रंगविलेल्या भिंतीचाही उपयोग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.c