नालासोपारा परिसरात एका अज्ञात इसमाने घरात घुसून पती पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. तुळींज पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. यात पती पत्नी जखमी झाले असून पत्नीची स्थिती नाजूक आहे. दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी मध्यरात्री नालासोपारा पूर्व संतोष भुवन परिसरात राहणाऱ्या अमित मिश्रा आणि त्याची पत्नी ज्योती घरात झोपले असता एका अज्ञात इसमाने घरात घुसून प्राणघातक हल्ला चढविला. यात पती पत्नी जखमी झाले आहेत. तर पत्नीची स्थिती नाजूक आहे. दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या संदर्भात माहिती देताना तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी माहिती दिली की, आशिष आणि ज्योती हे मूळचे उत्तरप्रदेशातील असून आठ महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला आहे. संतोष भुवन बावशेत पाडा येथे ते आठ दिवसापूर्वीच राहायला आले होते. शनिवारी ते दोघेही झोपले असता घराचा दरवाजा तोडून एक इसम घरात घुसला आणि त्याने दोघांच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार केला. यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पत्नीची स्थिती नाजूक आहे. शेजाऱ्यांनी आरोपीला घरातून पळून जाताना पाहिले आहे. त्यावरून पोलिसांना आरोपीची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यावरुन पोलीस अधिक तपास करत आहेत..