नगर : भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे तीन टोकाचे तिघे मातब्बर प्रथमच आज, मंगळवारी एका व्यासपीठावर आले होते. त्याला निमित्त ठरले ते भारजवाडी (ता. पाथर्डी) येथील नारळी हप्तय़ाच्या सांगता समारंभाचे. भूतकाळात परस्परांबद्दल टीकाटिप्पणी करत व्यक्त केलेला विरोध दूर सारत त्यांनी एकमेकांबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या.
भगवान बाबांनी सुरू केलेल्या ८९ व्या नारळी सप्ताहाची सांगता आज करण्यात आली. या वेळी बोलताना महंत डॉ. नामदेव शास्त्री म्हणाले,की खूप दिवसानंतर पंकजा मुंडे यांच्यासमोर बोलण्याची संधी मिळत आहे. तिला मी मुलगी मानत असल्याने तिचा दुस्वास करू शकत नाही. तिने स्वाभिमान बाळगायला हरकत नाही. धनंजय मुंडे यांची आई गडाची भक्त होती. या गडावर धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक झाली. मात्र आता गडावरील मंदिराच्या बांधकामाचे दगड होण्याचे भाग्य धनंजय मुंडे यांना मिळाले आहे. त्यांच्या प्रयत्नातून गडाला १० एकर जमीन मिळाली. पंकजा व धनंजय या दोन्ही भावंडांनी मोठी भरारी घ्यावी.
पंकजा मुंडे म्हणाल्या,की माझ्यासाठी जनता महंत आहे. मला गडाचे राजकारण करण्याची गरज नाही. सध्याचे सरकार चांगली मदत करते आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी तुम्हाला चुकीचे सांगितलेले दिसते.
धनंजय मुंडे म्हणाले,की घरातील माणसात संवाद असावा असे वाटत होते, तेच आज घडले. माझ्यात व पंकजात सुईच्या टोकाएवढे सुद्धा मतभेद नाहीत. गडाच्या बाबतीत जी जबाबदारी असेल ती बहीणभाऊ म्हणून आम्ही पार पाडू.
या सप्ताहाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.
तीन वर्षांनंतर महंत पद सोडणार
महंत नामदेव शास्त्री यांनी या वेळी, आणखी तीन वर्षांनंतर आपण गडाचे महंत पद सोडणार असल्याचे जाहीर केले. गोपीनाथ गडाला महंत नाही, मात्र भगवानगडाला महंत असल्याने हा गड टिकला. भगवान बाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी प्रयत्न करत आहे. गड शिल्लक राहिला पाहिजे, असेही ते म्हणाले.