Namdev Shastri on Dhananjay Munde : “बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीने न्यायालयात नुकतंच दोषारोपपत्र दाखल केलं. या दोषारोप पत्रामधून अनेक खुलासे समोर आले. या घटनेत वाल्मिक कराड हाच या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याची माहिती समोर आली. यातच वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप केला जातो. यावरून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. यातच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भातील काही फोटो समोर आले आणि राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर अखेर धनंजय मुंडेंनी यांनी काल (४ मार्च) राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचं समर्थन करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया समोर आलेल्या असताना आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत असताना त्यांनी भगवान गडावर जाऊन नामदेव शास्त्री यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर धनंजय मुंडे निर्दोष असल्याची प्रतिक्रिया नामदेव शास्त्रींनी दिली. यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं. भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी असल्याची भूमिका नामदेव शास्त्री यांनी जाहीर केली होती. आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.

नामदेव शास्त्री म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्याविषयीचं माझं वक्तव्य हे अजाणतेपणातून होतं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार गडावर आले, तेव्हा त्यांनी जाण करून दिली. तेव्हा या क्रूरतेची जाणीव झाली. तेव्हा माझंही अंतःकरण दुखावलं. न्यायालयाला मी प्रार्थना करतो की आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी. भगवान गड नेहमीच पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहे.”

पूर्वी नामदेव शास्त्री काय म्हणाले होते?

“ मी धनंजय मुंडे यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला. सर्व समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे. तसेच पक्षाचे सर्व नेते त्यांचे बालमित्र आहेत. मग असं असताना आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांना गुन्हेगार का ठरवलं जातंय? कारण ते एवढ्या वर्षांपासून आमच्या जवळ आहेत. तसेच ते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. तरीही त्यांना गुन्हेगार का ठरवत आहेत? जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे असंही मला वाटतंय. यात आमच्या साप्रदायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जातीयवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीवाद पुन्हा उफाळून आणला आहे”, असं महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं होतं.

Story img Loader